छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटलांना धमकावले ! सहाय्यक संचालकाच्या बदलीसाठी रस्ता अडवून शिवीगाळ !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाचे संचालक विभागाचा वर्धापन दिन क्रीडा स्पर्धा व स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम आटोपून हॉटेलमधून बाहेर पडत असताना १० ते १५ जणांनी त्यांचा रस्ता अडवला. औरंगाबाद विभागाचे सहाय्यक संचालक यांची बदली करा यासाठी या १० ते १५ जणांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी व शिवीगाळ केल्याची तक्रार संचालकांनी पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रेसीडेंट हॉटेल व लॉन्स, प्लॉट नं- T 26 MIDC सिडको, औरंगाबाद येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

अविनाश भालचंद्र पाटील (वय- 54 वर्षे व्यवसाय सरकारी नोकरी रा 301 लक्ष्मी नारायण संकुल पर्वती पुणे) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य येथे मागील एका वर्षापासून संचालक पदावर कार्यरत आहेत. संचालक अविनाश पाटील यांच्या पुणे येथील कार्यालयात मागील आठवड्यात औरंगाबाद शहर विकास आराखडा संघर्ष समीतीच्या अध्यक्ष राधाकिसन पंडित, उपाध्यक्ष- गुरुमितसिंग गिल, सचिव विजय पारवाल, सदस्य- संजय डवराणी, सदस्य- शेख मोबीन, सदस्य कारभारी गोविंद नवपुते, सदस्य सुरेश पवार व इतरांनी औरंगाबाद विभागाचे सुमेध खरवडकर सहाय्यक संचालक यांची बदली करण्यासंदर्भात निवेदन दिले होते.

त्यावेळी सदर व्यक्तीने संचालक अविनाश पाटील यांच्या ऑफिसमध्ये गोंधळ केला होता. म्हणून संचालक अविनाश पाटील हे त्यांना ओळखतात. औरंगाबाद विभागातील प्रभारी सहसंचालक सुरेश कमठाणे हे दि – 31/01/2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने तसेच विभागाच्या वर्धापन दिनानिमित क्रीडा स्पर्धा व स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम प्रेसीडेंट हॉटेल व लॉन्स, प्लॉट नं- T 26 MIDC सिडको, औरंगाबाद येथे होता.

सदर कार्यक्रमास संचालक अविनाश पाटील हे व त्यांचे सहकारी, अधिकारी व कर्मचारी सकाळपासून हजर होते. सदरचा स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अंदाजे 23:00 वाजेच्या सुमारास संचालक अविनाश पाटील यांच्यासह सर्वजण कार्यक्रम आटोपून घरी जाण्यास निघाले. त्याचवेळी प्रेसीडेंट हॉटेल व लॉन्सच्या बाहेरील बाजूच्या गेटवर ते आले असता अचानक औरंगाबाद शहर विकास आराखडा संघर्ष समीतीचे अध्यक्ष राधाकिसन पंडित, उपाध्यक्ष- गुरुमितसिंग गिल व त्यांचे इतर पदाधिकारी व सहकारी 10 ते 15 अनोळखी लोकांनी सदर ठिकाणी निवेदन देण्यासाठीची कार्यालयीन वेळ नसताना व कार्यालय नसताना समोरुन आले.

त्यांनी संचालक अविनाश पाटील यांचा रस्ता अडवून “तुमचे औरंगाबाद विभागाचे सुमेध खरवडकर सहाय्यक संचालक यांची बदली का करत नाही?” असा जाब विचारून संचालक अविनाश पाटील यांचा व इतर सहका-यांचा रस्ता अडवला. त्यानंतर घोषणाबाजी व शिवीगाळ केली. “तुम्ही आत्ताच्या आता सुमेध खरवडकर याची बदली करा, नाहीतर तुम्हाला येथून जाऊ देत नाही.” असे बोलून जोरजोराने घोषणाबाजी केली. त्यानंतर औरंगाबाद शहर विकास आराखडा संघर्ष समीती असे लेटरहेड संचालक अविनाश पाटील यांच्या हाती जबरदस्तीने दिले. निवेदनावर 31/01/2023 या तारखेचा उल्लेख आहे.

याप्रकरणी संचालक अविनाश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून राधाकिसन पंडित, गुरुमितसिंग गिल यांच्यासह १५ जणांवर एमआईडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!