महाराष्ट्र
Trending

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या ! ३० जूननंतर होणाऱ्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होतील !!

मुंबई, दि. २९ – राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून ३० जूननंतर होणाऱ्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होतील. पावसामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनची सुरूवात होत असून ३० जून नंतर मोठ्या प्रमाणात पावसाची सुरूवात होते. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पुर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते, म्हणून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामामध्ये शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने ते मतदानापासून वंचित राहू शकतात. ३० जून नंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५७ अनन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात कलम ७३ क क मधील तरतूदीला सुट देऊन २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्याप्रकरणी सर्वोच्च/मा.उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे. अशा सहकारी संस्था तसेच ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!