छत्रपती संभाजीनगर
Trending

डमी मीटर बसवून 3 लाखांची वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल ! पाच भाडेकरूंच्या खोल्यांमध्येही दिले कनेक्शन !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ : वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असतानाही डमी मीटर बसवून तीन लाख 16 हजारांची वीजचोरी करणाऱ्या इसमावर सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणच्या शहागंज उपविभागाचे सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ हे त्यांचे सहकारी नवाबपुरा शाखेचे सहायक अभियंता अभय अरणकल्ले, कनिष्ठ अभियंता संदीप पवार हे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तपासणी मोहीमेसाठी गट नं. 12039/1, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा येथे गेले. तेथे कायमस्वरूपी विद्युतपुरवठा बंद केलेल्या ग्राहकाच्या घरी जाऊन तपासणी केली. या ठिकाणी वीज वापरकर्ता हशीम कुरेशी इस्लाम कुरेशी याने अनधिकृतपणे मीटर बसवलेले आढळून आले.

तसेच त्याने महावितरणच्या विद्युत खांबावरून अंदाजे 70 फुट लांब काळ्या रंगाच्या वायरने या मीटरला विद्युतपुरवठा जोडून त्याच्या घरी तसेच अयुब सिकंदर पठाण, शामबानो इरफान खान, शेख असलम शेख इब्राहीम, साजीदखान वसिम खान व अरीफखान समीर खान या इतर पाच भाडेकरूंच्या खोल्यांमध्ये विद्युतपुरवठा घेऊन वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. महावितरणच्या पथकाने विद्युतपुरवठा खंडित करून मीटर जागेवरून काढून जप्त केले.

आरोपीने 13414 युनिटची वीजचोरी करून महावितरणचे 3 लाख 16 हजार 24 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी हशीम कुरेशी इस्लाम कुरेशीवर सिडको पोलिस ठाण्यात भारतीय ‍विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये 26 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!