महाराष्ट्र
Trending

महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ग्रामपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांचे समायोजन करणार !

- मंत्री उदय सामंत

मुंबई दि. 26 : अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले की, अकोला महानगरपालिकेने एकूण 89 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दस्ताऐवजांची पडताळणी केली असता विभागीय समितीने 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्ती प्रचलित नियमानुसार आहे की नाही याबाबत दिनांक 24 मे 2021 रोजी पुर्नतपासणी केली.

या 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी 5 कर्मचाऱ्यांच्या दस्तऐवजांमध्ये त्रुटी आढळून आल्याने प्राथमिक स्तरावर 26 कर्मचारी पात्र दर्शविण्यात आले आहेत. अपात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे दाखल केलेल्या रिट पीटिशन क्र.1889/2021 मध्ये मा. न्यायालयाने दिनांक 28 जून 2021 रोजी स्थगिती आदेश दिले होते. सदर आदेश दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी उठविण्यात आले आहेत.

अकोला महानगरपालिकेच्या 1509 पदांच्या आकृतिबंधास मंजूरी देण्यात आली असून, सेवाप्रवेश नियम अंतिम करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!