महाराष्ट्र
Trending

महावितरणचा महाराष्ट्राला जोरदार झटका, आपत्कालीन लोडशेडिंगमुळे भरपावसाळ्यात घामाच्या धारा !

विजेचा वापर काटकसरीने करा, महावितरणचे ग्राहकांना आवाहन

मुंबई, दि. १ : पावसाने ओढ दिल्याने राज्यात वाढलेल्या विजेच्या मागणीचा व उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी महावितरणला काही ठिकाणी नाईलाजास्तव आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. मात्र हे भारनियमन तात्पुरते आहे. मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत करत आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारून भारनियमन बंद होईल. नागरिकांनी विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन महिन्यांत अपेक्षेनुसार पाऊस न झाल्याने वातानुकूलित यंत्रे, पंखे व कृषिपंपाच्या वीजवापरात वाढ झालेली आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात विजेची मागणी कमी असल्याने विद्युत निर्मिती कंपन्यांचे काही संच पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असतात. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणीमध्ये ताळमेळ साधणे महावितरणला जिकिरीचे झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत महानिर्मितीचे देखभालीसाठी बंद असलेले विद्युत निर्मिती संचही सुरु करण्यात येत आहेत.

तथापि, शेतकऱ्यांकडून सध्या विजेची मागणी वाढली आहे. सोबतच तापमानामुळे इतर ग्राहकांचा वीजवापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मागणीएवढा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणची कसरत सुरू आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भार व्यवस्थापनामध्ये अडथळे येऊ नये यासाठी घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर सर्व वीजग्राहकांनी विशेषतः सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री १० या कमाल मागणीच्या कालावधीत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा.

विजेचा अनावश्यक वापर टाळावा. मागणीएवढा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व महावितरण आटोकाट प्रयत्न करत असून भारनियमन होऊ नये याची दक्षता घेत आहे. मात्र त्याउपरही भारनियमन झाल्यास नागरिकांनी संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे.

राज्यात शुक्रवारी सकाळी विजेची शिखर मागणी 24 हजार 300 मेगावॅट होती. जवळपास 800 ते 900 मेगावॅटचे भारनियमन करण्यात आले. सकाळी 6 ते 7.30 या काळात चक्राकार पद्धतीने जी 1, जी 2 व जी 3 या गटात भारनियमन करण्यात आले. दरम्यान, देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असलेले चार वीजनिर्मिती संच आजपासून कार्यान्वित झाले असून त्यापासून 1200 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

यात अदानी (620 मेगावॅट), जेएसडब्ल्यू (280 मेगावॅट), केंद्रीय युनिट (150 मेगावॅट) व महानिर्मिती नाशिक (110 मेगावॅट) यांचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी 400 ते 500 मेगावॅट वीज पॉवर एक्सचेंजमधूनही उपलब्ध झाली. देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असलेल्या अदानी (620 मेगावॅट) व महानिर्मिती कोराडी (620 मेगावॅट) या दोन वीजनिर्मिती संचामधून येत्या 6 ते 7 सप्टेंबरपासून अजून 1200 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात पाऊस येण्याचे अनुमान असल्याने येत्या काही दिवसांत आपत्कालीन भारनियमन संपुष्टात येईल.

Back to top button
error: Content is protected !!