राजकारण
Trending

शरद पवारांना धमकी देणारा मास्टरमाईंड शोधून त्याला गजाआड करा: अजित पवार

डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय होणं अधिक चिंताजनक: विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई, दि. ९ :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावर देण्यात आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार यांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रतील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, असा विश्वासही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांना सोशल मीडियावरून देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!