महाराष्ट्र
Trending

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा; सात संशयित शिक्षकांचे निलंबन !

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, त्यासंबंधी केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले.

मंत्री श्री केसरकर म्हणाले, “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर दि.०३.०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.१० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर चालू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० च्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. ही पाने साधारणात: सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत.

हे स्वयंअर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था / शाळांना निर्देश दिले आहेत.”

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला. यासंदर्भात केंद्रसंचालक यांनी दि.०४.०३.२०२३ रोजी शिवाजी पार्क, पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फीर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे गेला असून या गुन्हयामध्ये तीन अल्पवयीन व्यक्ती आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!