लिंगनिदान चाचणीवरून काळा गणपती, सिडकोत बंदूक रोखली, पडेगावच्या मजुराला फरपटत नेले ! सांगितली मुलगी निघाला मुलाचा गर्भ, अडुळच्या महिला डॉक्टराने गर्भपात केल्याने फुटले बिंग !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – सध्या गर्भ लिंग निदान चाचणीने डोके वर काढले असून मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणावरू सामोरे येत असतानाच आता यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पडेगावच्या दाम्पत्याकडून १६ हजार रुपये घेवून मुलीचा गर्भ असल्याचे सांगितले. त्यानंतर गर्भपातासाठी २५ हजार पुन्हा मागितले. मात्र, एवढे पैसे नसल्याने सदर दाम्पत्याने तेथे गर्भपात केला नाही. त्यांच्या नातेवाईकाच्या मदतीने त्यांनी आडूळला २० हजार रुपयांत गर्भपात केला. त्यानंतर त्या दाम्पत्याला कळाले की सदरचा गर्भ हा मुलीचा नसून मुलाचा होता. हे कळाल्यानंतर त्या एजंटमध्ये आणि गर्भपात केलेल्या महिलेच्या पतीमध्ये बाचाबाची झाली. झालेला खर्च परत देतो असे त्याने सांगितले व त्या एजंटाने त्याची दुचाकी तेथेच सोडली. दुचाकी परत करण्याचे व पैसे परत देण्याचे काळा गणपती सिडको येथे ठरले तेथे मात्र, राडा झाला. एजंटाच्या पटंरने बंदूकीच्या धाकावर त्यास मारहाण केली. नंतर पोलिस आले व प्रकरण ठाण्यात पोहोचले.
सुनील हरी पडुळकर (रा. चेतन नगर, तिसगाव, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,त्यांना 5 मुली असून ते मिस्त्रीचे काम करतात. सुमारे 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी पुन्हा गर्भवती राहिली होती. सुनील पडूळकर यांना यापूर्वीच 5 मुली झालेल्या असल्याने गर्भलिंग निदान करायचे ठरवले. त्यानुसार सुनील पडुळकर व त्याचा मित्र यांनी याबाबत माहिती कोठून मिळेल काय अशी विचारणा केली असता ओळखीचा एजंट ज्ञानेश्वर जाधव याचे नाव कळाले. एजंट ज्ञानेश्वर जाधव हा त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांकडून सोनोग्राफी करून मुलगा किंवा मुलगी असल्याचे सांगतो, अशी माहिती सुनील पडुळकर याला समजली.
त्यामुळे सुनील पडुळकर यांनी एजंट ज्ञानेश्वर जाधव याच्याकडे याबाबत विचारणा केली असता एजंट जाधव यांनी सांगितले की, आता गर्भ हा एक महिन्यांचा असल्याने सध्या सोनोग्राफीमध्ये मुलगा आहे किंवा मुलगी हे समजणार नाही, तुम्ही आणखी दोन अडीच महिने थांबा व नंतर आपन चेक करुया. त्यानंतर सुनील पडुळकर यांने एजंट ज्ञानेश्वर जाधव यास मोबाईल फोन केला व तुम्ही कधी चेक करणार आहेत असे विचारले असता त्याने सांगितले की सध्या डॉक्टर बाहेर गावी गेले आहेत, मी तुला नंतर स्वतः कॉल करून बोलावून घेतो. त्यानंतर एजंट जाधव याने सुनील पडुळकर यास मोबाईलवर कॉल केला व चेकींगसाठी सुतगौरणी चौकातील स्टेडियम जवळ पत्नीसह येण्यास सांगितले. त्यानुसार पत्नीला घेऊन ते त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्याने एजंट जाधवने सांगितले की, अजून डॉक्टर आले नाहीत तुम्ही थांबा, परंतु बराच वेळ होऊन देखील डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे माझ्या घरी जातो, घरी लहान मुले एकटीच आहेत असे सुनील पडुळकर एजंट जाधव यास म्हणाले. त्यावेळी एजंट जाधव याने त्यांना जबरदस्तीने थांबवून ठेवले.
काही वेळाने त्याठिकाणी दुचाकीवरून एक मुलगा आमच्याजवळ आला. व तो एजंट जाधव यास बाजुला घेऊन काहीतरी बोलला व पुन्हा ते सुनील पडुळकर याच्याकडे आले व त्यांनी सांगितले की, तुम्ही तुमच्या पत्नीला आमच्यासोबत पाठवा व तुम्ही येथेच थांबा. परंतु सुनील पडुळकर यांची लहान मुलगी रडत असल्याने व पत्नी देखील त्यांच्या सोबत एकटी जाण्यासाठी घाबरत असल्याने आम्हाला चेकींग करायची नाही म्हणून सांगितले. परंतु त्यांनी गळ घालून 15 मिनीटांत काम होऊन जाईल असे सांगून सुनील पडुळकर याच्याकडून 16 हजार रुपये रोख घेतले. व त्यानंतर त्या मुलाने सुनील पडुळकर यांच्या पत्नीला दुचाकीवर बसवुन कोठेतरी घेऊन निघून गेला. व परत 15 मौनिटानंतर दुसरा मुलगा दुचाकी वरून पत्नीला घेऊन आला व सोडून निघुन गेला.
त्यावेळी सुनील पडुळकर यांची पत्नी आली व रडू लागली डॉक्टरांनी मुलीचा गर्भ आहे म्हणून सांगितले. तिला कुठे चेक केले याबाबत काहीही सांगता येत नव्हते. त्यावेळी डॉक्टरांनी गर्भपात करण्यासाठी आणखी 25 हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर दाम्पत्याकडे तेवढे पैसे नसल्याने तेथून ते घरी निघून आले. जास्त दिवस झाल्याने खाजगी दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात गर्भपात करण्याची विनंती केली परंतु कोणीही गर्भपात करण्यास तयार नव्हते. त्यानंतर नातेवाईकाच्या मदतीने अडुळ एका महिला डॉक्टरांने 20 हजार रुपये घेवून गर्भपात करून दिला. त्यानंतर दाम्पत्यांना धक्कादायक माहिती कळाली की सदरचा गर्भ हा मुलीचा नसून मुलाचा आहे. एजंट जाधव व त्याच्या ओळखीचे डॉक्टर राजपुत यांनी गर्भ लिंग निदार करून मुलगी असल्याचे खोटे सांगून दाम्पत्याची फसवणुक केल्याचे लक्षात आले.
त्यानंतर सुनील पडुळकर यांनी एजंट जाधव यास फोन करून घरी पडेगाव येथे बोलावून घेतले असता तेथे दोघांमध्ये बाचाबाची झाली व तो त्याची पल्सर दुचाकी गाडी तेथेच सोडून निघून गेला. थोड्या वेळाने तो पुन्हा घरी आला व झालेला खर्च परत देतो असे सांगून निघून गेला. दिनांक 30/05/2024 रोजी सुनील पडुळकर यांनी एजंट जाधव यास कॉल केला व सांगीतले की, तुझी पल्सर दुचाकी गाडी येथेच असुन ती घेऊन जा व मला माझा झालेला खर्च परत दे. त्यावेळी त्याने सांगितले की, तुम्ही माझी गाडी काळा गणपती, सिडको येथे घेऊन या मी तुम्हाला तुमचा खर्च देतो. त्यानुसार सुनील पडुळकर त्याची पल्सर गाडी घेऊन मित्रांसह काळा गणपती मंदिराजवळ पोहोचले.
त्याठिकाणी एजंट जाधव व डॉ. राजपुत याच्या सांगण्यावरून सुनील पडुळकर व त्याच्या मित्रांना अनोळखी 5 ते 6 जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यातील एकाने त्याचेकडील कमरेला लावलेली गन काढून लोड करून सुनील पडुळकर यास जीवे मारण्यासाठी त्याच्या दिशेने रोखून धरली. तू लोकांच्या गाड्या घेतोस, तू काय दादा झालास काय, तुझी दादागीरी आता एकदाची संपवतो असे म्हणून गोळी मारत असताना सुनील पडुळकर यांनी त्याचेकडील गन खाली दाबली. त्यावेळी सुनील पडुळकर यास इतर जमलेल्या सर्व मुलांनी पुन्हा लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पल्सर दुचाकी हिसकावून घेतली. त्यानंतर सुनील पडुळकर यांना पकडून रस्त्याने मारत मारत जवळच असणार्या एका बांधकाम साईडच्या ऑफीसमध्ये फरफटत घेऊन गेले. त्यानंतर सुनील पडुळकर याच्या मित्राने पोलिसांना कळवले व पोलिसही तातडीने तेथे दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण आता पोलिस दप्तरी पोहोचले.
याप्रकरणी छावणी पोलिस स्टेशनमध्ये एजंट जाधव, डॉक्टर राजपूत, एक महिला डॉक्टर व ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe