महाराष्ट्र
Trending

बदनापूर तालुक्यातील बुटेगाव वैष्णवी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यावर तिघांचा मध्यरात्री हल्ला, कटरने सपासप वार !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ -: बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील वैष्णवी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यावर तीन युवकांनी मध्यरात्री हल्ला चढवला. कटर सारख्या धारदार शस्राने सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले. हा हल्ला कशामुळे केला, याचा तपास पोलिस करत आहे. पुजाऱ्याने आरडा ओरड केल्याने स्थानिक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले.

रणजीत गंगाधर सामाले (वय 50 वर्षे, पुजारी, वैष्णवी देवी मंदिर बुटेगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे जखमी पुजार्याचे नाव आहे. त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सामाले यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, तेरा ते चौदा वर्षांपासून ते वैष्णवी देवी मंदिरात सेवेकरी म्हणून काम पाहतात व तेथेच एकटे राहतात. पुजारी रणजीत सामाले यांना जेवनाचा डब्बा आजुबाजूचे व गावातील लोक देतात.

दि. 08/11/2023 रोजी पुजारी रणजीत सामाले हे रात्री 12.00 वाजेच्या सुमारास वैष्णवी देवी मंदिरातील कंपाऊंडमधील झाडांना पाणी देवून नेहमी प्रमाने मंदिरातील आतील बाजुने असणार्या खोलीत झोपी गेले. तेव्हा दि. 09/11/2023 रोजीच्या अंदाजे 02.30 वाजता मध्यरात्री तीन अज्ञात युवक मंदिराच्या गेटवरून आत शिरले. गेटचा खडखड आवाज आल्याने पुजारी रणजीत सामाले यांना जाग आली.

त्यामुळे पुजारी रणजीत सामाले हे झोपेतून उठून बाहेर येताच त्या अज्ञात युवकांपैकी एकाने त्याच्या हातातील असणारी काठीचा वार केला. त्या तिघा युवकांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. यातील दुस-या युवकाने पुजारी रणजीत सामाले यांच्यावर कटर सारख्या हत्याराने मारून जखमी केले. तिसर्या युवकाने पुजारी रणजीत सामाले यांना ढकलून दिले. यामुळे पुजारी रणजीत सामाले यांनी आरडा ओरडा केल्याने स्थानिक धावून आले. हे पाहून हल्लेखोर तीन युवक पसार झाले.

दरम्यान जखमी अवस्थेत पुजारी रणजीत सामाले यांना गाडी करून जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुजारी रणजीत सामाले यांनी दिलेल्या जबाबावरून बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये तीन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!