छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यात दरोडेखोरांचा हैदोस, पोलिसांच्या ८ पथकांनी ७ जणांच्या मुसक्या आवळल्या ! जानेफळ शिवारातील शेतात पोलिस व दरोडेखोरांत चकमक, दोन पोलिस जखमी !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – वैजापूर तालुक्यात दरोडेखोरांनी हैदोस घालून दोन ठिकाणी दरोडा टाकला. मनेगाव व कानडगाव येथे दरोडा टाकून ऐवज चोरी केल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी समयसूचकता दाखवून ८ पोलिस पथकं तैनात करून सर्च ऑपरेशन व कोंबिग ऑपरेशन करून ७ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. शिऊर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जानेफळ शिवारात तुरीच्या व मक्याच्या शिवारात पोलिस व दरोडेखोरांत चकमक उडाली. सुरुवातीला पोलिसांनी हवेत गोळीबार करून त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र दरोडेखोर पोलिसांवर सशस्त्र चालून आले. यात २ पोलिस जखमी झाले. अत्यंत शिताफिने पोलिसांनी तुरीच्या व मक्याच्या शेतात ५ जणांच्या मुसक्या आवळल्या तर यापूर्वीच दोघांना ताब्यात घेतले होते. एकूण ७ जणांना पोलिसांनी पकडले.

1) सागर रतन भोसले, वय 20 वर्षे  पडेगाव ता. कोपरगाव 2) रावसाहेब भिमराव पगारे वय 35 वर्षे रा. पडेगाव कोपरगाव या दोघांना सर्वात आधी अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तर पुढील चार जणांना दुसर्या टप्प्यात अटक करण्यात आली. 1) अमीत उर्फ अमीनखान कागद चव्हाण वय 23 वर्षे रा. हिंगणी ता. कोपरगाव (जखमी ) 2)शाम बडोद भोसले वय 27 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव 3) धीरज भारंब भोसले वय 19 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव 4) पांडूरंग उर्फ पांडू भारंब भोसले वय 26 वर्ष रा.पडेगाव ता. कोपरगाव 5) परमेश्वर दिलीप काळे वय 22 वर्ष  रा थेरगाव ता. कर्जत जि. अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 8/11/2023 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सपोनि संदीप पाटील पोलीस ठाणे शिऊर हे शिऊर परिसरात रात्रगस्त कामी असताना त्यांना माहिती मिळाली की, मनेगाव हद्यीतील शेतवस्तीवर विष्णू पंढरीनाथ सुरासे यांच्या घरी काही अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. तेथून सोने व चांदीचे दागिने, मोबाईल,रोख 45,000/- रुपयांचा ऐवज घेवून दरोडेखोर पसार झाले आहेत. यावरून सपोनि संदीप पाटील व त्यांच्या पथकांने त्यांचा माग काढता असताना त्यांना माहिती मिळाली की, पोलिस ठाणे देवगाव रंगारी हद्यीतील कानडगाव येथील शेतवस्तीवरील देवीदास व संगीता नलावडे यांच्याकडे सुध्दा अशाच प्रकारचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. तेथून सुध्दा सोण्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप असा एकूण  2,80,000/- रुपयांचा माल चोरून नेला आहे.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांची 8 पथके तयार करून शिऊर, देवगाव रंगारी, गंगापूर, कन्नड, वैजापूर परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. कोबिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देशही दिले. यावरून पोलिस या टोळीचा अत्यंत कसोशीने माग काढून पकडण्याचा प्रयत्न करत असताना शिऊर पोलीस हे खामखरी नदी, कानडगाव परिसरात नदीत उतरून अंधारत आरोपीतांचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, साकेगाव जवळील नायरा पेट्रोलपंपाच्या बाजुला अंधारात उभ्या असलेल्या टाटा एसी गोल्ड या वाहनात बसून काही जण हे भरधाव वेगात गेले आहेत.

यावरून पोलिसांनी संशयित वाहनाबाबत रोडवरिल हॉटेल चालकांकडून माहिती घेतली असता ते शिऊरच्या दिशने गेल्याचे समजले. यावरून शिऊर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. संशयित वर्णनाचे वाहन हे शिऊर बंगल्याचे दिशने जात असल्याचे दिसताच मागावरील असलेल्या पोलिसांनी बोरसर फाटा येथे रात्री 2:30 वाजेच्या सुमारास त्यांचा वाहनांचा वेग कमी होताच पोलिसांची गाडी आडवी लावून त्यांना थांबवले. यावेळी वाहनामध्ये समोरच्या कॅबीनमध्ये दोन जण आढळून आले त्यांना ताब्यात घेवून त्यांची गाडी क्रमांक एम.एच. 17 बी.वाय.9189 टाटा एसी गोल्डची पाहणी केली.

गाडीच्या पाठी मागील भाग हा प्लास्टिकच्या कॅरेटने भरलेला होता. पोलिसांनी गाडीची बारकाईने पाहणी केली असता तिच्यामध्ये फेरफार करून दोन कप्पे बनवले होते. समोरील भागात प्लास्टिकचे कॅरेट ठेवण्यात आले होते व त्याचे आडोशाने आतिल भागात 6 ते 7 व्यक्तींना बसता येईल असे नियोजन केलेले आढळून आले. या कप्यातून 6 ते 7 जण हे चाकू, तलवार असे घातक शस्त्रासह बाहेर येवून पोलिसांचे अंगावर चाल करून आले. त्यांचे पकडलेले दोन साथीदार सोडण्यासाठी घातक शस्त्रासह पोलिसांचे अंगावर येत असताना त्यांना पकडण्याचा अतोनात प्रयत्न केला असता ते अंधाराचा फायदा घेवून जानेफळ परिसरात फरार होण्यास यशस्वी झाले होते.

यावेळी शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघांना विश्वासात घेवून नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव 1) सागर रतन भोसले, वय 20 वर्षे  पडेगाव ता. कोपरगाव 2) रावसाहेब भिमराव पगारे वय 35 वर्षे रा. पडेगाव कोपरगाव असे सांगितले आहेत. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळांना भेट देवून गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध घेण्याचे स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच्या पथकांना सूचना केल्या तसेच पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आरोपी हे जानेफळ, वडजी, कोल्ही या परिसरात लपून असण्याची शक्यता असून त्यांचा कसोशिने शोध घेण्याचे निर्देश दिले.

यावरून दिनांक 09/11/2023 रोजी संपूर्ण परिसरात कोंबिग सर्च ऑपरेशन सुरू असताना स्था.गु.शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, सदर आरोपी हे जानेफळ शिवारातील तलावाचे वरच्या भागातील निमसे पाटील यांच्या तुरीच्या व मुख्तार शेख यांच्या मक्याचे शेतात लपून बसलेले आहेत. यावेळी मिळालेल्या माहितीच्या दोन्ही शेतात पथकाने सापळा लावला असता आरोपीतांची हालचाल दिसून येताच त्यांना ओरडून पोलिसांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु ते पोलिसांच्या आवाहानाला दाद देत नसल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिस हे शेतात पुढे जात असताना शेतात लपलेले दरोडेखोरांनी पोलीसांचे दिशने जोरदार दगडफेक सुरू केली.

यावेळी त्यांना पुन्हा शरन येण्याचे आवाहन करता ते पोलिसांना घातक शस्त्र दाखवून अधीक आक्रमक होवून पोलिसांना प्रतिउत्तर देवू लागले की, आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जिवंत मारून टाकू. यावरही पथकांने त्याच्या दिशने पुढे सरकत असताना यातील दोन दरोडेखोरांनी पो.उप.नि. भगतसिंग दुल्हत व पोलीस अंमलदार निकम यांचेवर जोरदार चाकु हल्ला करून त्यांच्या बरगड्या, दंडावर, छातीवर, हाताचे बोटावर गंभीर धारधार शस्त्राने वार केले. यावेळी त्यांचे इतर साथीदार हे जोरदार दगडफेक करत होते. यावेळी दरोडेखोर हे आक्रमक होवून पोलिसांचे जीवितास धोका निर्माण करत असल्याने पो.उप.नि. भगतसिंग दुल्हत यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्टल मधून 04 राऊंड हवेत गोळीबार केला. तरीही दरोडेखोर हे पोलिसांना शरण येण्याचे परिस्थीतीत नव्हते.

यावेळी एक दरोडेखोर हा परत पो.उप.नि. दुल्हत यांना मारण्याचे उद्देशाने चाकू घेवून त्यांच्या दिशने अंगावर धावुन येत असतांना त्याला रोखण्यासाठी तसेच स्वत:चे जीवितासह पोलीस अंमलदारचे जीवितांच्या संरक्षणार्थ त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हाल्वर मधून त्याच्या दिशने 02 राऊंड फायर केले असता तो जखमी होवून खाली पडला. यादरम्यान पथकांने त्यांच्या इतर साथीदारसह त्यांना अत्यंत शिताफिने जेरबंद केले आहे.

यामध्ये 1) अमीत उर्फ अमीनखान कागद चव्हाण वय 23 वर्षे रा. हिंगणी ता. कोपरगाव (जखमी ) 2)शाम बडोद भोसले वय 27 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव 3) धीरज भारंब भोसले वय 19 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव 4) पांडूरंग उर्फ पांडू भारंब भोसले वय 26 वर्ष रा.पडेगाव ता. कोपरगाव 5) परमेश्वर दिलीप काळे वय 22 वर्ष  रा थेरगाव ता. कर्जत जि. अहमदनगर  यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी विरुध्द एकूण 03 गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये पोलिस ठाणे शिऊर येथे भादंवी कलम 395, 397 प्रमाणे तर पोलिस ठाणे देवगाव रंगारी भादंवी कलम 395, 397 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचप्रमाणे पोलिस ठाणे शिऊर येथे भादंवी कलम 307,353,333,337,34 यासह कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक व सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिस ठाणे येथील सपोनि संदीप पाटील,  पोलीस अंमलदार राहुल थोरात, अमृत ठोके, विशाल पैठणकर, भरत कमोदकर, संभाजी आंधळे, श्रध्दा शेळके यांनी पार पाडली.  तर  दिनांक 9/11।23 रोजीची कारवाई मध्ये स्था.गु.शा. पथकातील पो.उप.नि. भगतसिंग दुल्लत, मधुकर मोरे, विजय जाधव, पोलीस अंमलदार सिरसाठ, दीपेश नागझरे,संजय घुगे, अशोक वाघ, वाल्मीक निकम यांनी कर्तव्य पार पाडले. तर देवगाव रंगारी सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार ऋषिकेश पैठणकर, भावसिंग जारवाल, केशरसिंग राजपूत, रोडगे यांनी आरोपीतांचा शोध मोहीम मध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!