छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम व्याजासह देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ! मुख्य लेखाधिकारी, नांदेड-वाघाळा मनपा आयुक्तांना दणका !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ -: लिपीकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम तीन टप्प्यांमध्ये व्याजासह देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आयुक्त महानगर पालिका नांदेड-वाघाळा यांना दिले. जर आयुक्त व मुख्य लेखाधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्याची जबाबदारी आयुक्त व मुख्य लेखाधिकारी यांची राहील असे मत नोंदवले.

नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील निवृत्त कर्मचारी नितीन श्रीनिवास तोरणकर, जावेद हमीद गुलाम याजधनी, ईलियास मोहम्मद सुलेमान, जुलफेकार अहेमद, मोहम्मद फरीद मोहम्मद हुसैन, मेराज अलीखान व अझर अली जुलफेकार अली हे लिपीक या पदावर कार्यरत / सेवानिवृत्त झाले असून त्यांनी नांदेड महानगरपालिका आयुक्त यांना नगर विकास विभाग यांच्या दिनांक 23/12/2021 रोजीच्या आदेशाप्रमाणे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील अस्थापनावरील अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन लागू करून सुधारीत वेतनश्रेणी निश्चित करून माहे डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी-2021 पर्यंतच्या फरकाची रक्कम अदा करण्यात यावी अशा स्वरूपाची विनंती केली होती. त्यावर आयुक्त यांनी कोणत्याही फरकाची रक्कम अदा केलेली नाही. त्या विरूद्ध नितीन तोरलकर व इतर सहाजण यांनी अॅड. प्रियंका प्रकाश शिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम व्याजासहीत देण्यासबंधीत रिट याचिकाद्वारे मागणी केली.

अॅड. प्रियंका शिंदे यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला की, याचिकाकर्ते हे फरकाची रक्कम मिळणेसाठी पात्र असून त्यांना अद्यापर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम मिळाली नाही व जनार्धन पकवाने (मुख्य लेखाधिकारी) यांना पूर्ण फरकाची रक्कम मिळाली आहे, तरी याचिकाकर्त्यांना फरकाची रक्कम व्याजासह देण्यात यावी अशा स्वरूपाचा युक्तीवाद केला. उच्च न्यायालयाने अॅड. प्रियंका शिंदे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून याचिकाकर्त्यास फरकाची रक्कम तीन टप्प्यांमध्ये व्याजासह देण्याचे आदेश आयुक्त महानगर पालिका नांदेड-वाघाळा यांना केले. जर आयुक्त व मुख्य लेखाधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्याची जबाबदारी आयुक्त व मुख्य लेखाधिकारी यांची राहील असे मत नोंदवले.

याचिकाकर्ते नितीन श्रीनिवास तोरणकर, जावेद हमीद गुलाम याजधनी, ईलियास मोहम्मद सुलेमान, जुलफेकार अहेमद, मोहम्मद फरीद मोहम्मद हुसैन, मेराज अलीखान व अझर अली जुलफेकार अली यांच्यावतीने अॅड. प्रियंका शिंदे यांनी युक्तीवाद केला त्यांना अॅड. प्रशांत जाधव यांनी सहकार्य केले तसेच महानगर पालिका यांच्यावतीने अॅड. सुहास उरगुंडे यांनी काम पाहीले.

Back to top button
error: Content is protected !!