महाराष्ट्र
Trending

न्यायाधीश अनुश्री सूरज गायकवाड यांचा सन्मान: कर्तबगार मुलींमुळे सासर, माहेरचाही गौरव- उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ

कळंब, दि.२७ : स्त्री शक्तीचा सदैव गौरव करणा-या भारतीय संस्कृतीला सर्व जगात तोड नाही. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत करा, कारण कर्तबगार मुलगी सासर, माहेर दोन्ही कुटुंबाचा नावलौकिक वाढवित असते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले.

तालुक्यातील सौंदणा (अंबा) या ठिकाणी गुरुवारी (दि.२७) हा सत्कार सोहळा झाला. गावातील अ‍ॅड अनुश्री सूरज गायकवाड यांची दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी वर्ग-एक या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सन्मानार्थ हभप दिनकर बाबा नायगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले.

यावेळी कळंबच्या उप विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अहिल्या गाठाळ म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांत कोविड व ओला दुष्काळ यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषतः अतिवृष्टी झाली तेव्हा सौंदणा परिसरातील अनुभव अविस्मरणीय राहिला आहे. गायकवाड परिवाराशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल त्यांनी गौरवपूर्व उल्लेख केला.

कर्त्या माणसाला कुटूंबाची साथ हवी- प्रत्येक घरामध्ये एक तरी माणूस कर्तबगार असतो. बाकी कुटुंबाने त्याच्या शब्दाला मान दिल्यास घराची भराभराट होत असते, असे प्राचार्य मधुकर गायकवाड म्हणाले. तर सासर व माहेर दोन्हीकडे मिळालेल्या पाठिंब्याने आपणास यश मिळाले, असे अ‍ॅड अनुश्री गायकवाड म्हणाल्या. यावेळी हभप दिनकरबाबा नायगांवकर यानी ’जोडूनिया धन उत्तम व्यव्हारे’ या अभंगावर निरुपण केले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत माजी कुलगुरु, प्राचार्य मधुकर गायकवाड, निळकंठ गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी केले .गावकरी यांच्यावतीने संदीप पालकर व सहकारी यांनी सत्कार केला.

आगळा वेगळा सोहळा- शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेक क्षेत्रात गावातील अनेकांनी नावलौकिक मिळविला. मात्र गावातून पहिल्यांदाच न्यायाधीश बनली तीही सुनेच्या रुपाने याचा आगळावेगळा आनंद सोहळा सौंदाण्यात ग्रामस्थांनी ठेवला. विशेष म्हणजे नायगांवकर यांच्या हस्ते भगवद्गीता तर अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते भारतीय संविधानची प्रत देऊन अनुश्री गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!