महाराष्ट्र
Trending

दिव्यांगांना लवकरच घरे उपलब्ध करून देणार, कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद !

जालना, दि. 21 :- दिव्यांगावर मात करण्यासाठी दिव्यांगाना विशिष्ट अशा साहित्याची गरज भासते, ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून आज आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दिव्यांगांना लागणाऱ्या साहित्याच्या नोंदीसह मोजमाप घेतले जावून महिनाभरात त्यांना साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील बेघर दिव्यांगांचेही सर्वेक्षण करुन त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरही उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अलीमको कानपूर, आरोग्य विभाग व समाज कल्याण विभाग (जिल्हा परिषद) यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी दिव्यांगांची पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर जालना येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा (मल्टीपर्पज शाळा) येथे आज करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, भास्करआबा दानवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सिध्दार्थ पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री दानवे म्हणाले की, ज्यांना काही कारणाने अपंगत्व आले आहे आणि असा वर्ग आजही विविध सुविधापासून वंचित आहे व त्यांना साहित्याची गरज असल्यास त्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश मागील सहा महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यानूसार दिव्यांग व्यक्तींचे ग्रामसेवकामार्फत सर्वेक्षण करुन जिल्ह्यात जवळपास 19 हजार दिव्यांग व्यक्ती असल्याचे नोंदविले गेले.

या संख्येपैकी ज्या दिव्यांग व्यक्तीकडे प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही, अशा जवळपास 2 हजार 500 दिव्यांग व्यक्तींना घरपोच प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले गेले. शिबीरात नोंद करणाऱ्या दिव्यांगाना अपंगत्वानूसार व्हील चेअर फोल्डींग, चाईल्ड व्हील चेअर फोल्डींग, ट्रायसिकल गतिमान, ट्रायसिकल मोटराईज्ड, कुबड्या, वॉकिंग स्टिक, कोपर कुबड्या, रोलेटर, सी.पी.चेअर, स्मार्ट फोन, दृष्टीबाधितांसाठी साधी व डिजिटल काठी, ब्रेल कीट, ब्रेल स्लेट, कानाचे मशीन, प्रोग्रामेबल कान मशीन, कृत्रीम पाय, कृत्रिम हात, कुष्ठरोग बाधितांसाठी किट आणि एमएसआईईडी कीटच्या मागणीची माहिती केंद्र शासनाला पाठवून लवकरच साहित्याचे मोफत वाटप केले जाईल. या कार्यक्रमाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींनी मोफत पुर्वतपासणी करणाऱ्या डॉक्टरांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिव्यांगांना मोफत साहित्य वाटपपूर्व तपासणी शिबीराचा हा भव्य कार्यक्रम होत आहे. शिबीराद्वारे आवश्यक असणाऱ्या दिव्यांग साहित्याची मागणी नोंदविणाऱ्या घटकांना एकूण चार प्रकारच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी अलीमको कानपूरकडून साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावर सर्वेक्षण करुन जवळपास अडीच हजार दिव्यांगांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करुन दिले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर सर्वेक्षण करुन दिव्यांग व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे आढळले त्यांना तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींचे नोंदणी शिबीर आठ दिवस चालणार आहे. शिबीरास दिव्यांग व्यक्ती, नागरिक, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!