महाराष्ट्र

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन ! बदली रद्द झाली म्हणून फटाक्याची आतषबाजी आणि डिजेच्या तालावर मिरवणूक काढणे भोवले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – बदली रद्द झाली म्हणून राजूर चौफुली येथून फटाक्याची आतषबाजी आणि डिजेच्या तालावर मिरवणूक काढली म्हणून जालना येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता संजय प्रभाकर सरग यांनी ही कारवाई केली.

अधीक्षक अभियंता संजय प्रभाकर सरग यांनी प्रकाश चव्हाण यांच्या निलंबन आदेशात नमूद केले आहे की, आपण सहाय्यक अभियंता म्हणून ग्रामीण उपविभाग जालना अंतर्गत जालना ग्रामिण शाखा क्र.३ येथे दिनांक १६/०७/२०१९ पासून कार्यरत होतात. मुख्य कार्यालयाचा बदली आदेश दिनांक १४.०७. २०२३ अन्वये आपली बदली रत्नागिरी परीमंडळ येथे बदली झाली होती. तदनंतर आपली बदली रद्द होउन औरंगाबाद परीमंडळ कार्यालयाचा आदेश दिनांक १८.०८. २०२३ रोजी आपली जालना ग्रामीण शाखा क्र ०३ येथे सविस्तर पदस्थापना करण्यात आली आहे.

दिनांक २१.०८.२०२३ रोजी आपली बदली रद्द झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राजुर चौफुली येथून महावितरण मंडळ कार्यालय जालना व तदनंतर महावितरण विभाग क्र ०१ जालना पर्यंत वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. यासंदर्भात विविध प्रसार व समाज माध्यमांमध्ये सदर बातमी फोटो व व्हिडीओ सह प्रसिध्द झाली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर Viral झाली. त्यामुळे महावितरणला जनसामान्यांच्या टीकेस सामोरे जावे लागले. परिणामी महावितरण कंपनीची प्रतिमा जनमाणसामध्ये मलीन झाली.

कार्यकारी अभियंता विभाग क्र ०१ जालना यांचे पत्र क्र का अ/जालना ०१/ मावि गोप / ३०२ दिनांक २३.०८. २०२३ नुसार या कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे की, सदर प्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन जालना येथे प्रकाश चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपल्या या गैरकृत्यामुळे महावितरण कंपनीची प्रतिमा जनमाणसामध्ये मलीन झाली आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाने केलेली बदली रद्द करून आणल्याबाबत आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे यामधून आपला शिरजोरपणा, उर्मटपणा, उध्दटपणा तसेच असभ्य वर्तन स्पष्टपणे दिसून येते. तसेच वरिष्ठांबद्दल अनादरभाव, कामावर असतांना बेबंद वर्तन केले असल्याचे स्पष्ट होते.

यावरून असे निष्पन्न होते की, आपणांकडून झालेले कृत्ये ही गंभीर स्वरुपाची असून मराविविकंम कर्मचारी सेवाविनियम मधील गैरवर्तवणूक या सदरात मोडतात. ज्या पदावर आणि ज्या कार्यालयात आपण काम करत आहात त्या पदावर आणि त्या कार्यालयात आपली सेवा चालु ठेवल्यास कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधा निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीत मी, संजय प्रभाकर सरग, अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी या नात्याने म.रा.वि.वि. कंपनी मर्या कर्मचारी सेवाविनियम-२००५ मधील प्रदान केलेल्या अधिकारानुसार आपणांस दिनांक २३/०८/२०२३ पासून म.रा.वि.वि. कंपनीच्या सेवेतून निलंबित करीत आहे. निलंबनाच्या कालावधीत उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या., उपविभाग परतूर यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीची सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

Back to top button
error: Content is protected !!