छत्रपती संभाजीनगर
Trending

महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ : महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे मंगळवारी (23 मे) रुजू झाले. याआधी ते महावितरणच्या मुंबईतील सांघिक कार्यालयात कार्यरत होते.

वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील केळेवाडीचे रहिवासी आहेत. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून 1991 मध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध वरिष्ठ पदांवर त्यांनी चिपळूण, गुहागर, खेड, भिवंडी, मुंबई, पेण, नागपूर आदी ठिकाणी काम केले आहे.

तर अकोला परिमंडलासह महावितरणच्या मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक, तांत्रिक आस्थापना, देयके व महसूल या विभागांचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक), महावितरणमध्ये संचालक (वाणिज्य) तसेच वीजपुरवठ्यासाठी अतिशय आहानात्मक असलेल्या त्रिपुरा राज्याच्या विद्युत मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. मुरहरी केळे यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्यिक असलेले डॉ. मुरहरी केळे यांची मराठी व इंग्रजीमध्ये पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादनदेखील केले आहे. सोबतच वीज वितरणासह प्रामुख्याने ‘स्मार्ट मीटर’संबंधी त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने त्यांना ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यवस्थापन, विधी, वाणिज्य, नियामक, लेखा परीक्षण आदी विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. विद्युत क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे 32 वर्षांचा अनुभव आहे.

Back to top button
error: Content is protected !!