महावितरण कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून पोलिस वसाहतीतील 850 घरांचा वीजपुरवठा केला पूर्ववत !
रात्री 2 वाजता जेसीबी मिळाला. पहाटे 4 वाजता खोदकाम
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह : पोलिस आयुक्त कार्यालय परिसरातील कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी खंडित झाला. अतिशय गुंतागुंतीचा बिघाड महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी सायंकाळपर्यंत शोधला. मात्र खोदकाम करून भूमिगत केबलचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम केले. शुक्रवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.
पोलिस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीतील ८५० घरांचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खंडित झाला. माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र वसाहतीत तीन वर्षांपूर्वी रस्ता झाल्याने व वीजपुरवठा करणारी भूमिगत केबल आठ ते दहा फूट खोल असल्याने केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे सायंकाळी साडेसहा वाजता बिघाड शोधण्यात यश आले.
वीजपुरवठा करणारे केबल वसाहतीतील गार्डनच्या भिंतीखाली असल्याचे आढळून आले. महावितरणने एजन्सीमार्फत कामगारांकरवी एका बाजूने खोदकाम सुरू केले. मात्र केबल खोल असल्याने जेसीबी मशीनची गरज असल्याचे लक्षात आले. पोलिस प्रशासनाकडून गार्डनमध्ये जेसीबी नेण्याची परवानगी रात्री 12 वाजता मिळाली. रात्री 2 वाजता जेसीबी मिळाला. पहाटे 4 वाजता खोदकाम पूर्ण करून केबल ओपन केली. अखेर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.
महावितरणचे सहव्यस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर, दीपक माने, सहायक अभियंता विनोद शेवणकर, महेश सोनार, नाथा जाधव, सुमीत जोशी, कंत्राटदार तय्यब नाईकवाडे व वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला. या कामासाठी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, नवनीत कांवत यांचे महावितरणला मोलाचे सहकार्य लाभले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe