टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करा ! मराठवाडयात 647 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची महावितरणची सेवा !!

मागेल त्यांना महावितरणकडून चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी

नांदेड, दि. 23 – नागरिकांनो, ई चार्जिंग वाहन मोटार सायकल, आॅटो रिक्षा, कार इत्यादी वाहन खरेदी केली. भविष्यात काहीजण ई चार्जिंग वाहन खरेदी करणार आहेत ! ही वाहने कोठे चार्जिंग करणार आहात ? हा प्रश्न नक्कीच वाहनधारकांना पडला असेल. याची काळजी करू नका. आपली काळजी घेण्यासाठी महावितरण कंपनी आहे ना ! महावितरण कंपनी मागेल त्यांना चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी वीज जोडणी देण्यासाठी तत्पर आहे. मराठवाडयात आठ जिल्हयात 86 चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. तसेच 561 चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा देण्याचे काम प्रगतीपथावर असून मराठवाडयात 647 चार्जिंग स्टेशनची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

पर्यावरण पुरक आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जात आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करु शकतो. याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

शिवाय खाजगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे. निमसार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी मंदगतीचे 15,000 चार्जर व मध्यम वेगवान चार्जर 500 अशी एकूण 15,500 चार्जिंग पायाभुत सुविधासाठी अंदाजे रु. 40 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याकरिता महावितरणमार्फत अद्ययावत वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

पॉवर अप

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने “पॉवर अप” नावाचे मोबाईल अॅप विकसीत केलेले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी, एसी). सुरु करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अॅपद्वारे बुकिंग). सद्य स्थळापासूनचे अंतर चालू स्थळावरुन जवळचे स्टेशन सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती उपलब्ध आहे.

चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणा-या एकूण वाहनापैकी 30 टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहन धारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जींगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितरणने मागेल त्यांना चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी देत आहे.

Back to top button
error: Content is protected !!