महाराष्ट्र
Trending

टपाल खात्याची खास महिला सन्मान बचत पत्र योजना ! एका महिलेच्या नावावर २ लाखापर्यंत कितीही बचतपत्रे घेता येणार !!

परभणी, दि. १४ -: प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी भारतीय टपाल खात्याची खास महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु केली असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी ३० जूनपर्यंत या योजनेत खाते उघडण्याचे आवाहन डाकघर अधीक्षक मोहमद खदीर यांनी केले आहे.

महिलांच्या सक्षमीकरण व त्यांची आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. एक हजार रुपये भरून बचत पत्र घेता येणार आहे. एका महिलेच्या नावावर २ लाखापर्यंत कितीही बचतपत्रे घेता येतील. परंतु, दोन खात्यात किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे. या योजनेतील गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. शिवाय हे व्याज चक्रवाढ पद्धतीने असणार आहे. त्यामुळे महिलांना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे.

ही योजना महिला आणि मुलींच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे. एका मुलीच्या नावावर अथवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. या योजनेची मुदत दोन वर्षे आहे. योजनेत पात्र खातेदार तीन महिन्याच्या अंतराने खाते उघडू शकतील. खाते उघडल्यापासून एक वर्षानंतर गरज पडल्यास ४० टक्के रक्कम फक्त एकदाच काढू शकतो.

खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील पूर्ण रक्कम काढून ते खाते बंद करता येते. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, मुलीचे व पालकाचे आधारकार्ड, पॅन कार्ड, मुलगी व पालकाचे दोन फोटो, रहिवाशी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि महिला अर्जदाराचे आधार, पॅन कार्ड व २ फोटो आवश्यक आहेत. योजनेची सर्व माहिती कोणत्याही जवळच्या डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी सन्मान बचत पत्र योजनेमध्ये खाते उघडावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी टपाल विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन डाकघर अधीक्षक मोहमद खदीर यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!