महाराष्ट्रराजकारण
Trending

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन केला नाही, पण भाजपने नेमलेल्या राज्यपालांनी महापुरुषांची बदनामी केली !

यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले...आपल्या बरोबर आले नाही त्यांना संपवण्याचे काम राज्यात सुरू आहे - जयंत पाटील

नागपूर दि. १६ एप्रिल – आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे… विदर्भवासियांची वज्रमूठ आहे… ही ‘वज्रमूठ सभा’ सध्याच्या राज्यकर्त्यांना विचारत आहे की, मागच्या १० महिन्यांत तुम्ही काय दिवे लावले…या सरकारने महाराष्ट्राला काय दिले ?… कोणते प्रकल्प विदर्भासाठी आणले ? …शेतकऱ्यांना काय मिळाले ? …अवकाळीसाठी शेतकऱ्यांना काय मदत दिली ?… तरुणांना सरकारने काय दिले ?…असे अनेक सवाल करत यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले…आपल्या बरोबर आले नाही त्यांना संपवण्याचे काम राज्यात सुरू आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नागपूरच्या ‘वज्रमूठ’ सभेत केला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन केला नाही. पण भाजपने नेमलेल्या राज्यपालांनी आपल्या महापुरुषांची बदनामी केली. लोक हा अपमान विसरले नाहीत, असेही ते म्हणाले.

आज नागपूरच्या क्रांतिकारी भूमीत महाविकास आघाडीची भव्यदिव्य ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. महाविकास आघाडीची याआधीची सभा छत्रपती संभाजी महाराज नगरात पार पडली होती. त्यासभेलाही लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला होता. या सभेलाही सभेचे मैदान लोकांनी तुडुंब भरले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

नागपूरने पाठिंबा द्यायचे ठरवले… विदर्भाने पाठिंबा द्यायचे ठरवले तर त्यात यश हे हमखास मिळते. स्वर्गीय इंदिरा गांधीजींनाही याच विदर्भातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला होता आणि त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या होत्या याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी या राज्याच्या विकासासाठी अनेक कामे मंजूर केली, त्या कामांना निधी दिला मात्र हे सरकार येताच त्यांनी या सर्व कामांना स्थगिती दिली. कोर्टानेही या स्थगित्या उठवण्याची मागणी केली पण या नतद्रष्ट सरकारने कामांवरची स्थगिती काही उठवली नाही. महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

शेजारचे राज्य आपले उद्योग तिकडे घेऊन जात आहे मात्र सरकारमधील लोक एक शब्द काढत नाही. कारण यांना भीती आहे की शेजारच्या राज्यातील नेत्यांना चिड आली तर आपली खुर्ची जाईल असेही जयंत पाटील म्हणाले.

या सरकार विरोधात तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. तरुण आपला रोष विविध प्रकारे व्यक्त करत आहे. मात्र आपल्या विरोधात जो बोलले त्याला तुरुंगात टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. या पलिकडे सरकारने काहीच काम केले नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन केला नाही. पण भाजपने नेमलेल्या राज्यपालांनी आपल्या महापुरुषांची बदनामी केली. लोक हा अपमान विसरले नाहीत. लोक निवडणुकांची वाट पाहत मात्र यांची छाती नाही, हे सरकार लोकांना घाबरत आहे, म्हणून हे इव्हेंटमध्ये व्यस्त आहेत. महाराष्ट्र काही दुधखुळा नाही. महाराष्ट्र वेळेवर उत्तर देईल. महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आज आपला भारत देश सर्वच स्तरावर पिछाडीवर जात आहे. हे मागच्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे ही ‘वज्रमूठ’ आता आपल्या अधिक भक्कम करायची आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जाऊ असा विश्वासही जयंत पाटील यांनी उपस्थित जनतेला दिला.

Back to top button
error: Content is protected !!