महाराष्ट्र
Trending

इतक्या कडाक्याच्या उन्हात महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? राज ठाकरेंचा थेट सवाल

ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ?

मुंबई, दि. १७ – काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारावर त्यांनी सडकून टीका केली.

यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?

सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.

Back to top button
error: Content is protected !!