महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ६७ हजार कोटींचं ओझं आम्ही त्यावेळी कमी केलं ! अन् आज बँकेकडून शेकडो कोटी ज्यांनी घेतले, थकवले व बुडवले त्यांना कर्जमाफी दिली जातेय, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल !!

अकोला, दि. १२ – आज थकबाकीचे प्रमाण देशात वाढले आहे. आमच्या हातात सत्ता असताना जो नियमित कर्ज भरत असेल त्याला कमी व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. एका वेळेला शेतीची सबंध अर्थव्यवस्था अडचणीत आली असं लक्षात आलं, त्यावेळेला ६७ हजार कोटी रुपयांचं कर्ज एका रक्कमेनी माफ केलं. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं आम्ही त्यावेळी कमी केलं. आज नेमकं त्यासाठी निर्णय होत नाही. मी पार्लमेंटमध्ये आहे, अनेक वेळेला मी बघतो केंद्र सरकार कर्जमाफीची नवीन-नवीन प्रस्ताव आणतात. पण, ती कर्जमाफी कोणाची ? ती कर्जमाफी शेतकऱ्यांची नाही, ती कर्जमाफी कष्टकऱ्यांची नाही. ती कर्जमाफी बँकेकडून शेकडो कोटी ज्यांनी घेतले, ज्यांनी थकवले व ज्यांनी बुडवले त्यांना कर्जमाफी आज केंद्र सरकार अनेक वेळेस देतं, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.

अकोला येथे आयोजित सहकार महर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमानिमित्त सहकार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केले.

आज जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्रित आलो आहोत. या जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट काळात सर्वसामान्य कष्टकरांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे जे कोणी महत्त्वाचे मान्यवर होते त्यांमध्ये अण्णा साहेबांचा उल्लेख हा करावा लागेल. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा अमरावतीत जन्म झाला. त्यांनी आपले सबंध आयुष्य अकोला जिल्ह्यात घालवलं. मला आठवतंय की, माझ्या राजकारणात सुरुवातीच्या काळात आमचा कुठे ना कुठेतरी संबंध यायचा. ५४ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून गेलो त्या काळामध्ये जे जागरूक आणि लोकांच्या प्रश्नांबद्दल आस्था असणारे विधिमंडळाचे सदस्य होते त्यामध्ये त्यांचा उल्लेख व्हायचा. १९५७ ते १९६७ या कालखंडामध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले होते. सार्वजनिक जीवनामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं असं हे त्यांचे घर होतं.

अण्णासाहेबांचा खरा रस हा शेती आणि शेतकरी कापूस उत्पादकांमध्ये- अण्णा साहेबांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलं पण त्यांचा खरा रस हा शेती आणि शेतकरी कापूस उत्पादकांमध्ये होता. आरोग्य संबंधी संस्थांचे, जसे इंडियन मेडिकल असोसिएशनचे त्यांनी काही वर्ष नेतृत्व केलं. पण खऱ्या अर्थाने त्यांचं मन हे सहकारी चळवळीमध्ये होतं. १९५७ या काळामध्ये मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी एक संघर्ष व एक चळवळ झाली. त्या चळवळीमध्ये अण्णा साहेब हे सहभागी झालेले होते. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे जे लोक होते त्यात एस. एम. जोशींचा उल्लेख करावा लागेल ही मंडळी आणि अण्णा साहेब यांच्यात सुसंवाद होता. आम्हा लोकांचा आणि त्यांचा संबंध जो आला तो खऱ्या अर्थाने कापूस उत्पादन आणि त्यांच्या प्रश्नांमधून आला. मला आठवतंय की, कापसाला उत्पादन खर्चाचा विचार करून योग्य भाव मिळत नव्हता. म्हणून जळगाव पासून नागपूर पर्यंत शेतकऱ्यांनी दिंडी काढली. त्या दिंडीमध्ये आम्ही अकोल्याला पोहोचलो आणि नेमकं त्यामध्ये पदार्पण हे अण्णा साहेबांचं होतं. पण त्यांनी जे आयोजन केलं होतं ते आयोजन पाहिल्यानंतर आम्हा लोकांना धक्का बसला. यासाठी धक्का बसला की, जवळपास ५० ते ६० हजार शेतकरी अत्यंत शांततेने त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. तेथून अमरावतीला आम्ही गेलो आणि अमरावतीच्या पुढे एके ठिकाणी आम्हा लोकांना अटक करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण हे सुद्धा आमच्यासोबत होते. त्या दिंडीमध्ये शेतकऱ्यांचे व कापूस उत्पादकांचे प्रश्न मांडण्यामध्ये अण्णा साहेबांचा फार मोठा वाटा होता, त्यापुढेही त्यांनी अनेक अशा चळवळी केल्या.

अखंडपणाने अण्णा साहेबांची साथ त्यांनी कधी सोडली नाही- दोन-तीन लोक मला आठवतात. अण्णा साहेबांच्या बरोबर मधुकरराव भोईवार काळी टोपी वाले उंच गृहस्थ होते, अखंडपणाने अण्णा साहेबांची साथ त्यांनी कधी सोडली नाही. वसंतराव धोत्रे यांनी त्यांची साथ त्यावेळी कायमची ठेवली. विचारांनी वेगळे असतील पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना साथ देण्याबद्दल मोतीराम लहाने यांचे सहकार्य त्यांना असत. या सर्वांना एकत्रित घेऊन एका बाजूला सहकार कसा मजबूत करता येईल आणि दुसऱ्या बाजूने उत्पादन खर्चाचा विचार करून कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्याला ऱ्हास्त किंमत कशी मिळेल ? यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिवाजी शिक्षण संस्था ही अमरावतीमध्ये निघाली पण तिचा विस्तार हा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झाला. त्यामध्ये १९७२ च्या आसपास या संस्थेच्या उपाध्यक्ष पद हे अण्णा साहेबांनी सांभाळलं. शिक्षण आणि शैक्षणिक संस्थेला कशी मदत करता येईल यासाठी त्यांनी अखंड काम केलं. सहकारी संस्थांमध्ये त्यांचं लक्ष होतं. डॉ. संतोष यांनी वडिलांची परंपरा चालू ठेवलेली आहे. याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे.

आज कापसाचे उत्पादन घसरले, लोक सोयाबीनकडे वळले- आज शेती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, किमतीचे, आयात- निर्यातीचे प्रश्न आहेत. आज कापूस आयात करण्यासंबंधीचा निर्णय हा घेतला जातो. खरं म्हणजे एकेकाळी हा संपूर्ण भाग कापूस उत्पादनाच्या अग्रभागी होता. आज कापसाचे उत्पादन घसरलेले आहे, अनेक तालुक्यांमध्ये कापूस कमी झालेले आहे. लोक सोयाबीनकडे वळलेले आहेत पण सोयाबीनचे सुद्धा यंदा अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. काल माझ्याकडे वर्धा जिल्ह्यातले शेतकरी आले होते आणि त्यांनी मोठ्यातला मोठा सोयाबीनचा एक गठ्ठा आणला. त्यातून एक दिसत होतं की, सोयाबीन कुजलेला आहे. म्हणजे सोयाबीन उत्पादक सुद्धा आज संकटात आलेला आहे. म्हणून या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या सबंध वर्गाने जागरूक राहावं म्हणून अण्णा साहेबांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आज त्यांच्या आदर्शांची जतन करण्याची आवश्यकता आहे. आजच्या राज्यकर्त्यांना याबद्दलची फारशी आस्था नाही.

आम्ही संघर्ष करतो पण त्या ठिकाणी आज कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही- आज थकबाकीचे प्रमाण देशात वाढले आहे. आमच्या हातात सत्ता असताना जो नियमित कर्ज भरत असेल त्याला कमी व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. एका वेळेला शेतीची सबंध अर्थव्यवस्था अडचणीत आली असं लक्षात आलं, त्यावेळेला ६७ हजार कोटी रुपयांचं कर्ज एका रक्कमेनी माफ केलं. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं आम्ही त्यावेळी कमी केलं. आज नेमकं त्यासाठी निर्णय होत नाही. मी पार्लमेंटमध्ये आहे, अनेक वेळेला मी बघतो केंद्र सरकार कर्जमाफीची नवीन-नवीन प्रस्ताव आणतात. पण, ती कर्जमाफी कोणाची ? ती कर्जमाफी शेतकऱ्यांची नाही, ती कर्जमाफी कष्टकऱ्यांची नाही. ती कर्जमाफी बँकेकडून शेकडो कोटी ज्यांनी घेतले, ज्यांनी थकवले व ज्यांनी बुडवले त्यांना कर्जमाफी आज केंद्र सरकार अनेक वेळेस देतं हे चित्र आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आम्ही संघर्ष करतो पण त्या ठिकाणी आज कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही. भूमिका बदललेली आहे.

नोकऱ्यांच्या बाबतीत हल्लीच्या सरकारने एक नवीन भूमिका घेतली आणि ती भूमिका म्हणजे कंत्राटी- आज देशामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेकारीचा आहे. हा बेकारीचा प्रश्न कसा घालवायचा? याबद्दलची अस्वस्थता तरुण पिढीकरीता आहे. नोकऱ्या या दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण, नोकऱ्यांच्या बाबतीत हल्लीच्या सरकारने एक नवीन भूमिका घेतली आणि ती भूमिका म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या मिळवायची. आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने करायची. आता जो पोलीस कंत्राटी भरतीने दाखल होतो त्याला ठाऊक असते की, आपले कॉन्ट्रॅक्ट हे वर्ष दीड वर्षाचे आहे, आपली नोकरी ही जास्त काळाची नाही आपल्या नोकरीत कन्फर्मेशन नाही. कंत्राटी पद्धतीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये खाजगीकरण वाढायला लागलेले आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही उत्तम शिक्षण संस्था आहे परंतु, राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांना दत्तक द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या शाळा संस्थांना न देता एखाद्या खाजगी कंपन्यांना दत्तक दिल्यामुळे शाळांचा उपयोग वैयक्तिक कामांसाठी केला जात आहे. नुकतेच घडलेले उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेला एका मद्य उद्योग करणाऱ्या कंपनीला दत्तक दिले गेले आणि त्या कंपनीने त्या शाळेत गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पोरांना काय शिकवायचं तर गौतमीचा धडा द्यायचा का त्यांना ? नव्या पिढीवर आपण काय संस्कार करतोय याचा विचार सरकारच्या मनात नाही आहे.

 शेतकऱ्यांशी बांधिलकी नसलेला एकही नेता येता कामा नये ही खबरदारी घ्या- डॉ. पंजाबरावांनी शैक्षणिक संस्था उभ्या करून एक वेगळे चित्र समाजात तयार केले हा आदर्श कुठे आणि खाजगीकरण कुठे ? शेतीच्या संबंधातील सरकारची धोरणे चुकीची असल्यामुळे कापसाचे भाव घसरत चाललेले आहेत. कांदा हा नाशिक आणि इतर काही भागातले महत्त्वाचे पीक आहे परदेशात कांद्याची निर्यात होते परंतु सरकारने त्यावर ४०% कर बसवला यामुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, रस्त्यात कांदा फेकून दिला त्याबरोबरच टोमॅटो देखील फेकून दिले गेले, तीच गोष्ट संत्र्यांच्या बाबतीत झाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने सरकारचे काही चांगले चित्र दिसत नाही, त्यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागेल. इथून पुढे हा सर्व भाग आणि इथलं नेतृत्व ज्यांच्या हातात द्यायचे त्यांना तुम्ही द्या पण, शेतकऱ्यांशी बांधिलकी नसलेला एकही नेता या ठिकाणी येता कामा नये ही खबरदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे.

काळ्या मातीशी इमान राखणारा जो कष्टकरी, उन्हा- तान्हाचा विचार न करता राबणारा आणि देशाच्या भुकेचा प्रश्न जो सोडवतो त्या शेतकऱ्याची साथ कधी सोडू नका- या जिल्ह्यात नेतृत्व बदलायचं कसं याचा विचार अण्णा साहेबांनी केला. माझ्या माहिती प्रमाणे अण्णा साहेब काँग्रेस विचारसरणीचे नव्हते ते शेकाप पक्षाच्या विचारधारेचे होते. हा विचार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना महत्त्वाचा वाटत होता म्हणून त्यांची बांधिलकी ही त्या ठिकाणी होती. म्हणून जबरदस्त नेता म्हणून ज्यांचा दबदबा होता अशा लोकांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्याचं काम अण्णा साहेबांनी केलं. मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की, राज्य कोणाच्या हातात द्यायचे असेल ते द्या, मी काय प्रचार करण्यासाठी आज या ठिकाणी उभा नाही. पण, काळ्या मातीशी इमान राखणारा जो कष्टकरी, उन्हा- तान्हाचा विचार न करता राबणारा आणि देशाच्या भुकेचा प्रश्न जो सोडवतो त्या शेतकऱ्याची साथ कधी सोडू नका. त्याला साथ द्या, त्याला शक्ती द्या माझ्या दृष्टीने हे काम आपण केलं तर खऱ्या अर्थाने अण्णा साहेबांना आपली श्रद्धांजली अर्पण होईल. अण्णा साहेबांनी जी जनसेवा केली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या साक्षीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो, असे शरद पवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!