छत्रपती संभाजीनगर
Trending

नविन शैक्षणिक धोरणावर प्राचार्यांसोबत मंथन ! चारशेहून अधिक प्राचार्य, प्रतिनिधीचा सहभाग !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.७ : केंद्रशासन, विद्यापीठ अनुदान आयोग व राज्याचा उच्च-तंत्रशिक्षण विभाग यांच्या निर्देशाप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यात येईल. या संदर्भात प्राचार्य, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी यांचाही सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०’ ची प्रभावीपणे अंमलबजावणी संदर्भात ऑनलाईन बैठक बुधवारी (दि.सात) झाली. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. शासन निर्णयानूसार ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’ची प्रभावीपणे अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून करण्यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, एनईपी समन्वयक व सर्व अभ्यास मंडळांचे अध्यक्ष यांची तातडीची ऑनलाईन बैठक बुधवारी झाली.

यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी ’अ‍ॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट’ अर्थात ’एबीसी’ हा महत्वाचा घटक आहे. सदर बदलेला पॅटर्न आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविता यावा यासाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहेत, असेही डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले.

सुमारे दोन तासांच्या बैठकीत सर्व अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, शिक्षण सहसंचालक डॉ.सुरेंद्र ठाकुर, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्यांनी देखील आपली मते मांडली. ’युनिक’चे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार, प्रोग्रामर दिनेश कोलते, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, अशिष वडोदकर आदींनी ऑनलाईन बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Back to top button
error: Content is protected !!