महाराष्ट्र
Trending

बोंढार हवेली गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने, दोषींविरुद्ध कठोर कारवाई ! त्याच दिवशी पोलिसांनी आरोपी पकडले !!

- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Story Highlights
  • तात्काळ कारवाई करून गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले समाधान
  • समता व एकोप्याचा समृद्ध वारसा जतन करण्याचा शांतता समितीच्या बैठकीत निर्धार

नांदेड, दि. ७ :- कोणत्याही गावातील जातीय तणाव हे रोजच्या जीवन व्यवहाराला, एकोप्याला बाधा आणणारे असतात. यात वर्षोनिवर्षे पिढ्यान पिढ्यांपासून जपलेली एकात्मता आपण अशा घटनांमधून हरवून घेता कामा नये. समाजातील सकारत्मतेसाठी, एकात्मतेसाठी आपण सारे पुढे येऊ यात. गुन्हेगारांवर कठोर कारवाई नक्की होईल. विश्वास ठेवा व समाजातील एकात्मतेचा विश्वास वाढवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी करून येथील एकात्मतेला कोणी बाधा पोहचवत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बोंढार हवेली घटनेच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, मनपा आयुक्त डोईफोडे, भदन्त पय्या बोधी, बाबा बलवंतसिंघ, शिवा नरंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव, शाम निलंगेकर, गजानन पाळेकर, प्रा. डी. बी. जांभरूनकर, भगवान ढगे, रमेश सोनाळे, शाम कांबळे, संजय पाटील, दिशांत सोनाळे, प्रल्हाद इंगोले, शाम पाटील वडजे, भालेराव, डॉ. गंगाधर सोनकांबळे, म. अजरूद्यीन व शांतता समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

घटना घडली हे सत्य आहे. त्याच दिवशी पोलिसांनी आरोपी पकडले हे सुद्धा सत्य आहे. काही संशयित असतील. परंतू ज्या जलदगतीने पोलिसांनी या घटनेप्रकरणी अटक करून तपास चालू केला याबद्दल पोलिसांच्या तत्परतेचे आपण अभिनंदन केले पाहिजे. या पीडित कुटुंबाला शासनातर्फे तात्काळ आर्थीक मदतही पोहचवली जात आहे. एकाबाजुला या सर्व बाबी प्रशासकीय पातळीवरून सुरू असताना समाजानेही संयमाची भूमिका ठेऊन एकात्मता, शांतता याला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज या महापुरूषांचा वारसा आहे. या सर्व महापुरूषांचे जयंती उत्सव सर्व गावांनी एकत्र येऊन साजरे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावेत. द्वेष भावना काढून एकोप्याने राहण्यातच सर्व समाजाचे हीत असल्याची भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

समाजातील शांतता भंग होण्यामध्ये सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता केलेल्या पोस्ट या घातक ठरतात. जबाबदार नागरिकांनी याकडे दूर्लक्ष करून सामाजिक सोहार्दता, एकोपा, आपसी भाईचारा, परस्परावरील विश्वास अधिक दृढ कसा होईल यावर भर देण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले. याचबरोबर जर समाजाला विघातक असलेल्या पोस्ट सोशल मिडियाद्वारे कोणी करत असेल तर त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारचे वैमनस्य निर्माण होऊ नये ही सर्वांचीच धारणा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात पण याचे रुपांतर हातात शस्त्र घेऊन जर होत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. असे कृत्य होऊ नये यासाठी समाजानेही अधिक दक्ष होऊन एकोपा ठेवला पाहिजे. सर्व धर्मात एकोपा राहणे ही काळाची गरज असून आपण शांतीचे दूत होऊ यात, असे आवाहन भदन्त पय्या बोधी यांनी केले.

यावेळी बाबा बलवंतसिंघ, शाम पाटील वडजे, शाम निलंगेकर, भगवान ढगे, प्रल्हाद इंगोले, शाम कांबळे, रमेश सोनाळे, गजानन पाळेकर, वैजनाथ देशमुख, डॉ. गंगाधर सोनकांबळे, शिवा नरंगले, दिशांत सोनाळे, संजय पाटील, महमंद अझरूद्यीन आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट बद्दल रोष व्यक्त करून शांतता व सदभावना यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button
error: Content is protected !!