छत्रपती संभाजीनगर

सुशोभिकरणाच्या नावाखाली ओळख पुसण्याच्या प्रयत्‍नावर अखेर बुलडोझर!; विद्यापीठात नवे इन-आऊट गेट जमिनदोस्त, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते “पुन्हा’ जिंकले!

संभाजीनगर, दि. १२ ः ऐतिहासिक संदर्भ असलेल्या विद्यापीठ प्रवेशद्वाराचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रतिगेटचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तीवर अखेर काल, ११ डिसेंबरला बुलडोझर चालला. सुशोभिकरणाच्या नावाखाली नवे इन-आऊट गेट उभारले जात होते. आंबेडकरी चळवळीतून याला मोठा विरोध सुरू झाला होता. पुढे हा संघर्ष तीव्र होण्याआधीच प्रशासनाला उपरती झाली आणि काम थांबवून झालेले बांधकामही अखेर पाडण्यात आले. मात्र यासाठी झालेल्या खर्चाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिगेटचे काम असे युद्धपातळीवर केले जात होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक संदर्भ आहेत. प्रवेशद्वार विद्यापीठाची ओळखही बनले आहेत. ही ओळखच पुसण्याचा प्रयत्‍न प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांत घडला. विशेष म्‍हणजे यासाठी आंबेडकरी चळवळीला विश्वासातही घेण्यात आले नाही. सुशोभिकरणाच्या नावाखाली येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र इन-आऊट गेट तयार करण्यात येत होते. गेटच्या दोन्ही बाजूंना कारंजे उभारले जाणार होते.

१४ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेगवान घडामोडी घडल्या. सुरक्षा भिंती, बाजूच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली. सुरक्षारक्षकांसाठी केबीन, इन- आऊट गेटचे आरसीसी व व वीटकाम पूर्ण होत असताना हे प्रतिगेट असल्याची जाणीव आंबेडकरी कार्यकर्त्यांना झाली. ज्‍येष्ठ नेते दिनकर ओंकार, सूर्यकांता गाडे, विजय वाहूळ, श्रावण गायकवाड, सचिन निकम, दीपक निकाळजे, राहुल वडमारे, डॉ. संदीप जाधव, गुणरत्‍न सोनवणे, कपील बनकर यांनी कुलगुरूंची भेट घेतली व विरोध दर्शवला.

यावेळी विरोध असेल तर काम थांबवून ते काढून घेऊन, असे आश्वासन कुलगुरूंनी त्‍यांना दिले होते. त्यानंतर कुलसचिवांना त्‍यांना तसा आदेश दिला. कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून नव्या गेटचे काम थांबविण्यास सांगितले. बांधकामही दोन दिवसांत पाडायला सांगितले. त्यामुळे काल सकाळी नव्या गेटवर बुलडोझर चालले. आंबेडकरी चळवळीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Back to top button
error: Content is protected !!