महाराष्ट्र
Trending

१५० फूट खोल दरीत बस कोसळली, १२ जणांचा मृत्यू ! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात !!

मुंबई, दि. 15- सुमारे १५० फुट खोल दरीत बस कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे घडली.  या खाजगी बसमध्ये मुंबईच्या गोरेगाव परिसरातील झांजपथक होते. पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा कोसळली आहे.

लोणावळ्यानजीक बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ ही भीषण घटना घडली. दोरीच्या मदतीने परिसरातील ट्रेकर्स, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून बसमधील जखमी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या खाजगी बसमध्ये ४५ प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरूणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

Back to top button
error: Content is protected !!