छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद परिमंडलात अडीच हजार वीजचोरांवर कारवाई, 175 जणांवर गुन्हे दाखल !

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यांत वीजचोरीविरोधातील धडक मोहिमेत २५२९ प्रकरणे उघडकीस आली. यात वीजचोरांना ४ कोटी ६१ लाख रुपयांची बिले आकारण्यात आली आहेत. ही बिले न भरल्यास वीजचोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल दिले जाते.

तसेच दंड (कंपाऊंडिंग चार्जेस) आकारला जातो. वीजचोरीचे निर्धारित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, विहित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो.

मीटरमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी करणे, रिमोटच्या साह्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटर असतानाही आकडा टाकून वीजचोरी करणे अशा प्रकारे वीजचोरी केली जाते. महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीजवापराचे नियमित विश्लेषण करत असते.

यात काही ग्राहकांचा वीजवापर कमी झाल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांचा वीजवापर खरोखर कमी झाला आहे की काही फेरफार केला याची पडताळणी महावितरणकडून केली जाते. यासाठी मोहीम राबवून वीजचोरांवर धडक कारवाई केली जात आहे.

एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या नऊ महिन्यात औरंगाबाद परिमंडलात ३७ लाख ५४ हजार ५०४ युनिटची ४ कोटी ६१ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यात २४२१ वीजचोऱ्या या मीटरमध्ये छेडछाड व आकडे टाकून करण्यात आल्या आहेत. तर १०८ प्रकरणांत भार बदल, अनधिकृत वापर असे प्रकार आहेत.

१७५ जणांवर गुन्हा दाखल

वीजचोरीचे बिल व दंडाची रक्कम न भरणाऱ्या वीजचोरांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत. औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यात वीजचोरी करणाऱ्यांवर १७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षेची तरतूद

वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!