देश\विदेश
Trending

देशाला मिळालं नव संसद भवन, प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण !

या नव्या संसद भवनाची प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कण गरिबांच्या कल्याणासाठी 
  • स्मरणार्थ नाणे तसेच टपाल तिकीट केले जारी
  • “नवीन संसद भवन हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे”
  • “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा जगाला संदेश देत आहे”
  • “या पवित्र सेंगोलचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील”
  • “आपली लोकशाही ही आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हा आपला निर्धार आहे”
  • “अमृत काळ हा आपल्या वारशाचे जतन करतानाच, विकासाचे नवे आयाम घडवण्याचा कालावधी आहे”
  • “अमृत काळ हा आपल्या वारशाचे जतन करतानाच, विकासाचे नवे आयाम घडवण्याचा कालावधी आहे”
  • आपल्याला या इमारतीच्या कणाकणात एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेची अनुभूती जाणवते ”
  • “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते”

नवी दिल्ली, दि. 28- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, प्रधानमंत्र्यांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही भेट आहे,”त्यांनी सांगितले. प्रधानमंत्र्यांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश जगाला देत आहे,” त्यांनी पुढे सांगितले, “नवीन संसद भवनाची इमारत नियोजनाला वास्तवाशी, धोरणांना प्रत्यक्ष परिस्थितीशी, इच्छाशक्तीला अंमलबजावणीशी आणि संकल्पाला सिद्धतेशी जोडते.” आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे हे माध्यम असेल.ही इमारत आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार असेल आणि विकसित भारत वास्तवात उतरविण्याचे काम ती पूर्ण करेल. प्रधानमंत्री म्हणाले की ही नवी इमारत म्हणजे प्राचीनता आणि आधुनिकता यांच्या सह-अस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.

नवीन भारत नवी उद्दिष्ट्ये साध्य करत असून नव्या मार्गांची उभारणी करत आहे यावर भर देत प्रधानमंत्री मोदी म्हणाले, “नव्या मार्गांचा स्वीकार करूनच नव्या गोष्टींची उभारणी करता येते.” “देशात आता नवी उर्जा, नवा जोम,नवी उत्सुकता, नवी विचारधारा आणि नवा प्रवास यांची सुरुवात होते आहे. आपल्यामध्ये नवी दृष्टी, नव्या दिशा,नवे निर्धार आणि नवा विश्वास निर्माण होत आहे,”ते उद्गारले. प्रधानमंत्री म्हणाले की, सारे जग आता भारताचा निर्धार, भारतीयांचे सामर्थ्य आणि भारतातील मनुष्यबळाचे जीवन यांकडे अधिक आदराने आणि आशेने पाहत आहे. “जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा संपूर्ण जग प्रगती करते,” ते म्हणाले. नवीन संसद भवन भारताच्या विकासातून जगाच्या विकासाला चालना देईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत प्रधानमंत्री म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले.

“भारत हा फक्त लोकशाहीवादी देश नाही तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे”, असे प्रधानमंत्री म्हणाले. जागतिक लोकशाहीसाठी राष्ट्र हा मूलभूत पाया आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात लोकशाही ही फक्त एक व्यवस्था, प्रणाली म्हणून रूजलेली नाही तर ती संस्कृती, विचारप्रक्रिया आणि परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले. वेद आपल्याला लोकशाही सभा आणि समित्यांची तत्वांची शिकवण देतात असे त्यांनी वेदांचा संदर्भ देत सांगितले. महाभारतात प्रजासत्ताकाचे वर्णन सापडते आणि वैशालीत भारत लोकशाही जगला आणि तिथे भारताने लोकशाही अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. “भगवान बसवेश्‍वरांचे अनुभव मंटप्पा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे”, असे मोदी पुढे म्हणाले.इ.स. 900 मधील तामिळनाडूमध्ये सापडलेल्या शिलालेखांविषयी प्रधानमंत्री बोलले. आजच्या काळात आणि युगातही हे शिलालेख सर्वांना आश्चर्यचकित करतात असे मोदी म्हणाले.आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे आणि आपली राज्यघटना हाच आपला संकल्प आहे. ही प्रेरणा, या संकल्पाचा सर्वात मोठा प्रतिनिधी आपली संसद आहे”, असे मोदी यांनी नमूद केले. जे पुढे जाणे थांबवतात त्यांना दैवही साथ देत नाही, परंतु जे पुढे जात राहतात त्यांचा भाग्योदय होतो असे एका श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले.

कित्येक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, कितीतरी गमावल्यानंतर भारताने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि तो अमृतकालापर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले. “अमृतकाल म्हणजे आपला वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठण्यासाठीचा काळ आहे. या काळात देशाला नवी दिशा देण्याचा हा अमृत काळ आहे. असंख्य आशाआकांक्षाची पूर्तता करण्याचा हा अमृत काल आहे.” असे त्यांनी सांगितले. लोकशाहीसाठी नवसंजीवनीची गरज असल्याचे त्यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले. लोकशाहीचे कार्यस्थळ म्हणजेच संसद ही नवीन आणि आधुनिक असायला हवी यावर प्रधानमंत्र्यांनी भर दिला.

भारतातील समृद्धी आणि वास्तुकलेच्या सुवर्णकाळाचे स्मरण त्यांनी केले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आपले हे वैभव हिरावून घेतले, असे ते म्हणाले. 21व्या शतकातील भारताकडे मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.“आजच्या भारताने गुलामगिरीची मानसिकता सोडून कलेच्या त्या प्राचीन वैभवाकडे पुन्हा वळला आहे. नवीन संसद भवन हे या प्रयत्नाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला तसेच कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत.,” असे प्रधानमंत्री म्हणाले. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी मोर तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल कमळावर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी केली. “या वास्तूच्या प्रत्येक कणात एक भारत श्रेष्ठ भारताचा भाव आहे”, असे ते म्हणाले.

संसदेच्या जुन्या इमारतीत काम करताना येत असलेल्या अडचणी प्रधानमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्या. तांत्रिक सुविधांचा अभाव आणि सभागृहात बसण्याच्या जागांची कमतरता यासारखी उदाहरणे त्यांनी दिली. संसदेच्या गरजांवर अनेक दशकांपासून चर्चा झाली असून नवीन संसद भवनाचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. नवीन संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि सभागृहांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नवीन संसद भवनाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमिकांशी झालेल्या संवादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी सभागृहात उभारण्यात आली आहे. श्रमिकांचे योगदान संसद भवनात कायमस्वरूपी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

कोणताही तज्ञ गेल्या 9 वर्षांना पुनर्रचना आणि गरीब कल्याण वर्ष मानेल. नवीन इमारतीविषयी अभिमान वाटत असतानाच गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली याचेही समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे 11 कोटी शौचालये, गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 50 हजारांहून अधिक अमृत सरोवरे आणि 30 हजारांहून अधिक नवीन पंचायत भवन यासारख्या उपाययोजनांबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. “देश आणि देशांच्या नागरिकांचा विकास ही एकच प्रेरणा पंचायत भवनापासून ते संसदेपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करते, असे ते पुढे म्हणाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण करून देत प्रधानमंत्री म्हणाले की, प्रत्येक देशाच्या इतिहासात अशी वेळ येते जेव्हा त्या देशात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. भारतात अशी वेळ स्वातंत्र्याच्या 25 वर्षांपूर्वी गांधीजींच्या असहकार चळवळीच्या कालखंडात आली होती आणि या चैतन्यामुळे संपूर्ण देश विश्वासाच्या वातावरणाने भारला होता, असे त्यांनी अधोरेखित केले.‌ “गांधीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वराज्याच्या संकल्पाशी सांधले होते. प्रत्येक भारतीय, स्वातंत्र्यासाठी लढतोय, असा तो काळ होता. याचा परिणाम म्हणूनच 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. याच ऐतिहासिक कालावधीची तुलना, आजच्या स्वतंत्र भारतातील स्वातंत्र्याच्या अमृतकाळ या टप्प्याशी करता येईल. भारत येत्या 25 वर्षात आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, ही 25 वर्षे म्हणजेच अमृत काळ होय, असे त्यांनी नमूद केले. या 25 वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. “ भारतीयांची आपल्या ध्येयाप्रति असलेली निष्ठा ही केवळ एका राष्ट्रापुरती मर्यादित नाही, याला इतिहास साक्षीदार आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने त्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली होती, याकडे लक्ष वेधले. “विविधतेने नटलेला, प्रचंड लोकसंख्येचा भारतासारखा देश जेव्हा विविध आव्हानांना तोंड देत, त्यावर मात करत, विश्वासाने पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो जगातील अनेक देशांना प्रेरणा देतो. भारताचे प्रत्येक यश येत्या काळात जगातील विविध भागांतील विविध देशांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. भारताचा विकासाचा दृढनिश्चय इतर अनेक देशांसाठी पाठबळ ठरणार असल्याने, भारताची जबाबदारी आणखी वाढते, असेही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले.

यशस्वी होण्यासाठी देशामध्ये निर्माण झालेला विश्वास, संसद भवनाची ही नवी वास्तू अधिक दृढ करेल आणि विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देईल. “राष्ट्र प्रथम या भावनेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करायची आहे. कर्तव्याचा मार्ग अनुसरायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे. स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा घडवत आपल्या चांगल्या वर्तणुकीचा आदर्श निर्माण करायचा आहे. आपल्याला आपला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा आहे आणि स्वबळावर वाटचाल करायची आहे ,” असेही ते म्हणाले.

संसद भवनाची नवी वास्तू जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाला एक नवी ऊर्जा आणि एक नवे बळ मिळवून देईल. आपल्या श्रमिक बांधवांनी या वास्तूला भव्यत्व मिळवून दिले आहेच, आता समर्पित वृत्तीने काम करुन या वास्तूचे दिव्यत्व-पावित्र्य वाढवण्याची जबाबदारी, आपल्या सर्व संसद सदस्यांची आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संसदेचे महत्त्व पटवून देताना प्रधानमंत्र्यांनी सांगितले की 140 कोटी भारतीयांचा दृढ निश्चय, संकल्प, संसदेला पावित्र्य प्रदान करतात.

संसदेत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे येणारी अनेक शतके भारताची शोभा, आदर वाढवतील आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सशक्त सक्षम बनवतील अशी आशा व्यक्त केली. गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग आणि समाजातील प्रत्येक वंचित कुटुंब यांच्यासह वंचितांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग संसदेमधून जातो, असे त्यांनी अधोरेखित केले. “संसद भवनाच्या या नव्या वास्तूची प्रत्येक वीट न वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कण न कण गरिबांच्या कल्याणासाठी वाहिलेला आहे,” असे मोदी यांनी सांगितले. संसद भवनाच्या या नव्या वास्तूत, येत्या 25 वर्षात निर्माण होणारे नवीन कायदे, भारताला विकसित राष्ट्र बनवतील, भारतातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी मदत करतील आणि या देशाचा युवावर्ग तसेच महिलांसाठी नव्या संधी निर्माण करतील असेही पंतप्रधानांनी ठासून सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना प्रधानमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की संसद भवनाची ही नवी वास्तू, नव्या संपन्न, मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीचा पाया ठरेल. धोरण, न्याय, सत्य, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचा मार्ग अनुसरुन सामर्थ्यशाली बनणारा असा हा भारत देश आहे असे म्हणून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Back to top button
error: Content is protected !!