छत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची मालमत्ता शासनाने स्वत: खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सहकार आयुक्तांना सादर ! ठेवी परत करून दिवाळी गोड करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा !!

गोरगरीब ठेवीदारांना शासनाने दिवाळीत ठेवीची रक्कम देण्याचा तात्काळ निर्णय घ्यावा: खासदार इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने लिलावाची मालमत्ता स्वत: खरेदी करून गोरगरीब ठेवीदारांना दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी ठेवीची रक्कम परत करून सहकार्य करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती; त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बारहाते यांनी आदर्श मालमत्ता शासनाने स्वत: खरेदी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकारी सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांना असल्याने त्यांना सविस्तर प्रस्ताव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पाठवला आहे.

छत्रपती संभाजीनगर सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी आदर्शची जप्त केलेली मालमत्ता शासनाने स्वत: खरेदी करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकारी त्यांच्या कार्यालयास नसल्याचे नमुद करुन योग्य ते निर्णय घेणेस्तव पत्र सहकार आयुक्त व निबंधक यांना पाठविल्याचे खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

इतर लोकांप्रमाणेच आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनाही दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या लहान मुले-मुलींनी सुध्दा मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करता यावी याकरिता शासनाने आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची जप्त केलेली मालमत्ता स्वत: खरेदी करण्याचा निर्णय तात्काळ घेण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती.

गोरगरीब ठेवीदारांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा सर्व ठेवीदारांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!