वैजापूर
Trending

वैजापूरच्या खान गल्लीतील कुंटणखान्यावर छापा ! सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामींच्या धडाकेबाज कारवाईने बडे मासे गळाला लागण्याची शक्यता !!

महक स्वामी यांच्या पथकाची कुंटणखान्यावर छापा कारवाई 

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यावाल्यांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे. एकापाठोपाठ एक कारवाईचा धडाका सरु असून पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने वैजापूरमधील खान गल्लीत छापेमारी करून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. पाच महिला वेश्याव्यवसाय करताना मिळून आल्या. एकूण 1,19,763/- रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला असून एजंट आणि बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20/03/2023 रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना गोपनिय माहिती मिळाली की, खान गल्ली वैजापूर येथे काही महिला वेश्यव्यवसाय करत आहेत. त्यावरून महक स्वामी यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करणेकामी व छापा कारवाई करणेकामी पोलीस पथक तयार केले. तत्पूर्वी पंच व एक डमी ग्राहकास पैसे देऊन त्याठिकाणी खरच व्यश्याव्यवसाय चालतो का याबाबत खात्री करून इशाऱ्याने कळवणे बाबत सांगितले.

तोपर्यंत महक स्वामी यांनी वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार यांना बोलावून घेऊन सापळा रचला. डमी ग्राहकाकडून इशारा मिळताच अचानक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खान गल्ली वैजापूर येथे चालू असलेल्या कुंटनखाण्यावर छापा मारला. त्यात पाच महिला वेश्याव्यवसाय करताना मिळून आल्या.

तर वेश्यागमण करण्याकरिता आलेले तीन ग्राहक (पुरुष ) या छापा कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत. छापा कारवाईमध्ये सदर ठिकाणहून 36,000/- रुपये किमतीचे 10 मोबाईल हँडसेट, 81,763 रुपये रोख रक्कम, 2000/- रुपये किमतीचे इतर साहित्य व दहा निरोधचे बॉक्स असा एकूण 1,19,763/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळून आलेल्या महिलांकडे विचारपूस केली असता त्या मध्यस्थी तीन महिला यांच्या सांगण्यावरून खान गल्ली येथे असलेल्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे सांगितले.

त्या बदल्यात सदर महिला या वेश्यगमणातून मिळालेल्या पैशांपैकी अर्धे पैसे अरोपींना देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यावरून पोलीस स्टेशन वैजापूर येथे स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम ( पिटा ॲक्ट ) 1956 या कायद्याच्या विविध कलमांतर्गत मध्यस्थी तीन महिला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करत आहेत.

सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या व पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी वैजापूर पोलीस स्टेशनचा चार्ज स्वीकारला तेंव्हापासूनच्या सततच्या धडाक्याच्या कारवायांमुळे वैजापूर तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या अशा धडाकेबाज कारवायांमुळे वैजापूर वासियांकडून पोलिसांना अभिनंदनाचा वर्षाव होत असून समाधान व्यक्त करत आहेत. अशाच प्रकारे अवैध धंद्यांना खीळ बसली तरच आजचा तरुण अवैध मार्गांपासून दूर राहील व वैजापूर शहराची स्वच्छ प्रतिमा आणखी उजळेल यात शंका राहणार नाही.

या कारवाईच्या अनुषंगाने महक स्वामी यांनी वैजापूर उपविभागात कुठलेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत तेंव्हा अवैध धंदे करणाऱ्यांनी वेळीच सुधरावे अन्यथा कारवाईचा बडगा चालूच राहिल. अशी तंबी देखील दिली. ही छापा कारवाई सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, उपविभाग वैजापुर ,पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि श्रीराम काळे, पोलीस अंमलदार- मोईस बेग, ज्ञानेश्वर शिंदे, अजय गोलवाल, योगेश कदम, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, प्रशांत गिते, विजय भोटकर, पंकज गाभूड, गणेश पैठणकर, नवनाथ निकम महिला पोलीस अंमलदार वर्षा गादेकर आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!