छत्रपती संभाजीनगर
Trending

सिडकोत बत्ती गूल: महावितरणच्या उच्चदाब वाहिनीची केबल तोडली ! ए जी कन्स्ट्रक्शनचा सुपरवायजर व जेसीबीचालकावर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीची केबल तोडून नुकसान केल्याप्रकरणी ए.जी. कन्स्ट्रक्शनचा सुपरवायजर व जेसीबीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सिडको एन-1 भागातील 11 केव्ही सेंट्रॉन विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ पी. एल. चव्हाण यांनी चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता सतीश अधाने यांना दिली. त्यानंतर अधाने हे कर्मचारी विनोद तितर यांच्यासह त्या ठिकाणी गेले. उच्चदाब भूमिगत ‍विद्युत वाहिनी तपासली असता लोकसेवा हॉटेलपाठीमागील रवी मसालेसमोर दोन ठिकाणी केबल तुटलेले दिसले.

आजूबाजूस पाहणी केली असता त्या ठिकाणी ए. जी. कन्स्ट्रक्शनचे रोडचे काम सुरू होते. तेथे हजर असलेल्या सुपरवायजरला विचारले असता रोडचे काम करताना जेसीबीचालकाकडून केबल तुटल्याची कबुली त्याने दिली. तसेच ए.जी. कन्स्ट्रक्शनचे एम. डी. आरीफ खान हे असून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले. तेव्हा चालक जेसीबी घेऊन गेला.

ए. जी. कन्स्ट्रक्शनकडून काम करून घेण्यासाठी महावितरणने दीड ते दोन तास वाट पाहिली. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सदर फीडरवर शहराचा संवेदनशील भाग असल्याने तात्काळ केबल जोडणे आवश्यक होते. त्यामुळे महावितरणने खाजगी ठेकेदारामार्फत काम केले आणि 4 वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला.

ए. जी. कन्स्ट्रक्शनच्या सुपरवायजरने रोडचे काम करण्यासाठी महावितरणला माहिती न देता व कोणतीही परवानगी न घेता तसेच चालकाने जेसीबी निष्काळजीपणे चालवून महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वाहिनीचे केबल तोडून सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे 61 हजार रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे दोघांवर सहायक अभियंता सतीश अधाने यांच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button
error: Content is protected !!