औरंग्याचे नाव घेणार्याला माफी नाही, आरोप करणाऱ्यांना प्रात:विधीसाठी सुद्धा हायकमांडची परवानगी घ्यावी लागते: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मुंबईत सुलोचनादीदींचे अंत्यदर्शन, तर वरोर्यात धानोरकर कुटुंबीयांची भेट
मुंबई/नागपूर/वरोरा, दि. 5 – आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हेच आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेणार असेल तर त्याला माफी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केले.
छत्रपती संभाजीनगरमधील एका युवकाने औरंगजेबाचा फोटो दाखवत नृत्य केल्याच्या बातमीसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. औरंगजेबाचे फोटो कुणी झळकवणार असेल तर ते मान्य केले जाणार नाही, असेही ते म्हणाले. कालच्या दिल्ली दौर्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आरोप करतात, त्यांची अशी अवस्था आहे की, प्रात:विधीसाठी सुद्धा त्यांना हायकमांडची दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे? राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे आणि तो केव्हा होईल, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत दोन्ही पक्षांत समन्वय घडवायचा, यासंदर्भात व्यापक चर्चा काल करण्यात आली.
मुंबईत सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन!
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिनेसृष्टीत आपल्या कार्यकर्तृत्त्वामुळे काही नावे अजरामर आहेत. त्यातील एक नाव सुलोचनादीदी. प्रारंभी नायिका आणि नंतरच्या काळात त्यांच्या आईच्या त्यांच्या भूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांची संपूर्ण कारकिर्द थक्क करणारी. विविध पुरस्कार त्यांना मिळाले. पण, या सर्व पुरस्कारांपेक्षाही बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या आठवणी पुढच्या पिढीला मार्ग दाखवित राहतील आणि यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.
त्यानंतर नागपूर येथून देवेंद्र फडणवीस यांनी वरोरा गाठले आणि तेथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. चंद्रपूरचे खा. बाळुभाऊ धानोरकर यांचे अतिशय तरुण वयात निधन झाले. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्त्व अतिशय झपाट्याने विकसित होत होते. पण, काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले, अशी शोकसंवेदना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe