छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

विद्यापीठ निधीतून ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती सुरु, तासिका तत्त्वावर २४५ जागा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ निधीतून ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असून तासिका तत्त्वावरील २४५ पदांसाठीही ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

विविध पदव्यूत्तर विभाग व उस्मानाबाद उपपरिसरातील मंजूर २८९ पैकी सध्या १४४ जागांवर प्राध्यापक कार्यरत आहेत. तर रिक्त १४५ जागांपैकी ७३ पदांची भरती प्रस्तावित असून या संदर्भातील मान्यता प्रलंबित आहे . या पार्श्वभूमीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विद्यापीठ निधीतून कंत्राटी व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला.

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी यास मान्यता देण्यात आली. २४ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे विद्यापीठ निधीतून ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे. यामधे मुख्य परिसरातील २१ विभागातील ३० पदांचा समावेश आहे . तर गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतील नऊ व परिसरातील सहा पदांचा समावेश आहे. तर तासिका तत्वावरील २४५ पदांचा समावेश आहे. यामध्ये मुख्य परिसर, उस्मानाबाद उप परिसर, मॉडेल कॉलेज घनसावंगी, संतपीठ पैठण, जीएमएनआयआरडी, डीडीयुकेके, प्रीआयएएस कोचिंग सेंटर आदींसह ५५ विभागांचा समावेश आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच १८ कंत्राटी पदे भरली ही संख्या आता ४५ वर पोहोंचली आहे.

नव्याने सुरू होत असलेल्या न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स ) या विभागात कंत्राटी चार व तासिका तत्त्वावरील चार अशी आठ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने २६ जूनपर्यंत भरावेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. कंत्राटी पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांनी ३० जून पर्यंत अर्जाची हार्ड कॉपी आस्थापना विभागात दाखल करणे बंधनकारक आहे.

गुणवत्तेवर निवड- प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाची मान्यता मिळाली नसली तरी विद्यापीठ निधीतून कंत्राटीपदे भरण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे. गेल्या वर्षी कंत्राटी पदासाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली तर तासिका तत्वावरील प्राध्यापकांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात आली. गुणवत्तेच्या आधारावर पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात अध्यापनाचीही संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!