महाराष्ट्र
Trending

आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती, हायकोर्टाच्या आदेशाने कुंभकर्णी झापेतील सरकारला आली जाग !

खासदार इम्तियाज जलील यांच्या याचिकेची गंभीर दखल

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी अंती दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करून महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद / होमीओपॅथीक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य विभागांतर्गत सरळसेवेने तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील विविध पदे परिक्षेव्दारे भरती करीता जाहीरात प्रसिध्द केली.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात गट-क या संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा – २०२३ चे आयोजन केले आहे. परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची तारीख १०/०५/२०२३ ते २५/०५/२०२३ आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया व इतर सविस्तर तपशिलासाठी संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका क्र. ४७/२०२१ दाखल केली होती. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील हे स्वत: व्यक्तिश: न्यायालयात त्यांची बाजु मांडून युक्तिवाद करत आहेत.

उच्च न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय रिक्त पदांमुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे कशा प्रकारे हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच राज्यात वैद्यकीय रिक्त पदांची इत्यंभुत माहिती सुध्दा उच्च न्यायालयात सादर केली होती. उच्च न्यायालयाने सदरील प्रकरणाची गंभीरतेने दखल घेवून शासनाला रिक्त पदे भरती संदर्भात कालबध्द कार्यक्रम सादर करुन विविध आरोग्य विभागात विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे अंतिम आदेश दिले होते. तसेच यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे आदेशात नमुद केले होते.

खासदार इम्तियाज जलील यांच्या माहितीप्रमाणे जाहीरातीत दिलेल्या विविध संवर्गातील पदांसाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त ८ ते १० हजार जणांना महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयात नोकरी लागणार आहे. जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी, शर्तीची पूर्तता करणार्‍या उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे अर्ज सादर करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!