छत्रपती संभाजीनगर
Trending

सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतजमीन भाड्याने द्या, वर्षाला एकरी 5‍0 हजार मिळवा ! शासकीय जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींनाही मिळणार १५ लाखांचे अनुदान !!

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ : कृषिपंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राज्य शासनाने जाहीर केला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

33 केव्ही उपकेंद्रापासून 10 किमीपर्यंतची सरकारी जमीन तर 5 किमीपर्यंतच्या खासगी जमिनीची महावितरणला गरज आहे. खासगी जमिनीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी एकरी 30 हजार दिले जात होते. त्यात आता वाढ करून 50 हजार वार्षिक भाडे देण्यात येणार आहे. तसेच शासकीय जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींनाही १५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शेतकरी व ग्रामपंचायतींनी जागा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महावितरणचे मुख्‍य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले आहे.

सौर प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कृषिपंपांना दिवसा दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्री-अपरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याचा त्रास वाचणार आहे. असे सौर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातही उभारण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. मात्र महावितरणला प्रकल्पासाठी जितकी जमीन हवी त्यापैकी केवळ 10 टक्के जमीन सध्या उपलब्ध झाली आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायतींनी जमीन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. या जमिनीसाठी शेतकऱ्यांना दरवर्षी 50 हजार प्रतिएकर भाडे देण्यात येणार आहे. यात दरवर्षी 3 टक्के वाढ देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी पूर्वी 10 हजार रुपये असलेले प्रक्रिया शुल्क आता केवळ 1 हजार करण्यात आले आहे.

वीज उपकेंद्रापासून जवळ असणाऱ्या जमिनीला प्राधान्य देण्यात येणार असून या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला हातभार लागणार आहे.

या योजनेत सहभागी होऊन आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar-mskvy/index__mr.php या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!