छत्रपती संभाजीनगर
Trending

समृद्धी महामार्ग तीन दिवस दुपारी साडेतीन तास बंद राहणार ! जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर अशी असेल पर्यायी वाहतूक !!

उच्चदाब वाहिनीचे काम; पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर व गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तिनही दिवस दुपारी १२ ते साडे तीन यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर, गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तीन दिवस दुपारी १२ ते साडेतीन यावेळात होणार आहे. हे तीनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी १२ ते साडेतीन) जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडेल.

निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल.

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतूक सुरळीत सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!