महाराष्ट्र
Trending

आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवला, बीड जिल्ह्यात जमाव आक्रमक ! एकाच दिवशी दोन आमदारांच्या बंगल्यासह चार ठिकाणी जाळपोळ !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – बीड जिल्ह्यात आंदोलक जमाव आक्रमक झाला असून एकाच दिवशी दोन आमदारांचे बंगले, बीडमधील सनराईज हॉटेल आणि नगर परिषदवर जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरात जमावाने जाळपोळ केली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर तर तुफान दगडफेकही करण्यात आली. सहा ते आठ मोटारसायकल आणि तीन कारला हे पेटवून दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या टिकणार्या आरक्षणाबाबत उदासीन असून संपूर्ण राज्यात त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. हजारों गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी घातली असतानाच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आज जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ करीत दगडफेक केली. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजलगावमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर जमाव चालून गेला. जमावाने जाळपोळ केली. दगडफेकही केली. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जवळपास सहा ते सात मोटारसायकल या जाळपोळीत कोळसा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या मोटारसायकली गेटच्या आत होत्या.

याशिवाय तीन आलिशान कारही या आगित जळाल्या. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एक गाडी तर त्यांनी उलटवून लावली. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असून सध्या ते अजित पवार गटांत आहेत. जाळपोल आणि दगडफेकीच्या या घटनेमुळे सध्या प्रकाश सोळंके यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जाळपोल आणि दगडफेकीची घटना घडली तेंव्हा आमदार प्रकाश सोळंके हे घरातच असल्याची माहिती मिळतेय.

यानंतर नगर परिषदेत जमाव चालून गेला. तेथे जाळपोळ करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातच एका हॉटेललाही आग लावण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवून दिला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजपा आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालयही फोडण्यात आले आहे. कार्यालयात आंदोलक घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरु केली. आमदार प्रशांत बंब हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. कार्यालयात तोडफोड करून आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान, दगडफेक व जाळपोळ करणारे हे मराठा आंदोलक आहे की आणखी कोणी ? मराठा समाजाला या आंदोलनाच्या आडून बदनाम करण्याचा कोणी डाव रचत आहे का ? याचा शोध घेण्यात येत आहे. मराठा समाज हा शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी ओळखला जातो. लाखोंच्या संख्येने ५८ मूक मोर्चे काढणार्या मराठा समाजाची जगाने दखल घेतलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!