महाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत सूसाट धावल्या १० लाख प्रवासी गाड्या, लवकरच दुसरा टप्पा सुरू करणार !

महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करतानाच सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई, दि. 3 : “महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची” ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. दरम्यान, समृद्धी महामार्गाचा आतापर्यंत १० लाख प्रवासी वाहनांनी लाभ घेतला असून लवकरच दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्यअतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘जागृक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० लाख प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!