महाराष्ट्र
Trending

उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ! कार्यकर्त्यांना साद घालत शरद पवारांचे अजितदादा व भाजपावर शरसंधान !!

शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे तर भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक- शरद पवार

मुंबई, दि. ५ – आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया. उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अशी साद ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकरत्यांना घातली. याचबरोबर अजितदादा समर्थक व भाजपावर पवारांनी शरसंधान साधलं.

कार्यकरत्यांच्या बैठकीला संबोधन करताना, शरद पवार म्हणाले, आजची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे. २४ वर्षांपूर्वी मुंबई शहरामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोंची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज २४ वर्षे झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कोणी आमदार, खासदार तर कोणी मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य सरकार चालवू शकतो, हे राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी देशाला दाखवले. अनेक नवीन नेते तयार केले. यात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा ही एकच भावना होती. राज्यातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामात तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो.

आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत. ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्रं आहेत. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा म्हणाव्या तशी कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहेत.

केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलंय. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. त्यावेळी एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे, त्यातून मार्ग काढणे, हे सूत्र या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज चित्र बदललं आहे. संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद हवा.

मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत असायची की एखादा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयासंबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद ठेवायचा. अयोग्य असेल ते दुरुस्त करण्याची मानसिकता ठेवायची. आज देशात हा संवाद नाही. आम्ही सत्ताधारी पक्षात नाही पण लोकांमध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी सामान्य माणसाच्या दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण राज्यकर्त्यांचा संवादच नसेल तर त्या गोष्टींवर मर्यादा येतात.

आज देशातील जनतेमध्ये अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवण्यासाठी संसदीय पद्धतीला शक्ती देण्यासाठी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पहिल्या संवादात सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्या सगळ्यांना संघटीत करण्यास सुरुवात केली. यासाठी बैठका घेत आहोत. हे जसे घडायला लागले तशी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते अस्वस्थ होऊ लागले.

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींचा आरोप केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विधानं आधार नसताना करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना बोलण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरंच जर कोणी चुकीचे काम केले असेल त्यावर कारवाई केली पाहिजे. पण त्यांनी तेवढी धमक दाखवली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये त्याच पक्षाला बरोबर का घेतले? याचा अर्थ हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलून जनमानसात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात.

आमदारांना दमदाटी, नवी पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यात अडथळे, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. राज्यात काहींनी बाजूला जायची भूमिका घेतली त्याचे दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. ज्या कार्यकर्त्यांमुळे हे दिवस आणले त्यांना किंवा पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसायचे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.

काल नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काही गडबड करण्यात आली. काही लोक पोलिसांच्या मदतीने कार्यालयाचा ताबा घेतात आणि सांगतात हा पक्ष आमचा, ही घड्याळाची खूण आमची आहे. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कोणाला दिली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. खूण कुठेही जाणार नाही. ही गोष्ट खरी असली तरी खूण हे देशाचे राजकारण करत नाही. मी अनेक निवडणुका लढलो. त्यात घड्याळ, हात, चरखा, गाय-वासरू अशा चिन्हांवर लढलो आहे. जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंत:करणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे तोपर्यंत काही चिंता करण्याची गरज नाही.

आज काही लोकांनी भाषणं केली, त्यात माझ्याबद्दल बोलताना मी त्यांचा गुरु आहे असे सांगत होते. आज त्या सहकाऱ्यांच्या मेळाव्यात मागे असलेला फोटो पाहिला तर त्यावर सर्वात मोठा फोटो माझा होता. अनेक पोस्टरमध्ये माझा फोटो लावला. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही, खण्णकन वाजत नाही हे लोक ओळखतील.

मला पांडुरंग, गुरु असे म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे- पांडुरंगाच्या भेटीमध्ये बडवे येऊ देत नाहीत असा उल्लेख काहींनी केला. पांडुरंगाच्या दर्शनाला येणं देशात कोणी थांबवू शकत नाही. मला पांडुरंग, गुरु असे म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे. जेव्हा निवडणूक आली तेव्हा दीड-दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्यांना संधी देऊ नका असे काहींनी मला सांगितले. पण त्यांच्यावर अन्याय झाला असे मला वाटले. अशावेळी सहकाऱ्याला तोंडावर पडू न देण्याची भूमिका घेतली. माझा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. तिकीट दिले, सरकार आले तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या नावांमध्ये पहिले नाव त्यांचे देण्यात आले, ही भूमिका आपण घेतली.

राज्यकर्त्यांनी राज्य एकत्रित ठेवायची भूमिका घेतली पाहिजे. भाजपच्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा भाषणात हे राज्य तोडण्याची, वेगळा विदर्भ करण्याची वक्तव्यं केली. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे.

आपले काही सहकारी गेले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मात्र आठ-दहा दिवसांपूर्वी भाषण ऐकले तर राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री आला नाही असे त्यांचे भाषण होते. आता असल्या मुख्यमंत्र्यांसमोर नमस्कार करून काम करणार.

…उद्ध्वस्त करणे, त्याची मोडतोड करणे हे भाजपचे सूत्र- आम्ही भाजपसोबत गेलो त्यात काय चुकलं असे सांगण्यात आले. नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली हे सांगितले. ते खरं आहे. प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी राज्यं आहेत तिथे अतिशय बारकाईने निर्णय घ्यावे लागतात. तिथे उद्रेक झाला आणि त्याचा गैरफायदा शेजारील देशाने घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागेल. त्यामुळे त्याठिकाणी बाहेरुन पाठिंबा दिला. इथे आतच जाऊन बसले. त्यामुळे त्यांनी दिलेले उदाहरण माझ्या मते योग्य नाही. जे जे लोक देशात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले तिथे काही कालावधीनंतर जो सहकारी आहे तो उद्ध्वस्त करणे, त्याची मोडतोड करणे हे भाजपचे सूत्र आहे. त्यांनी पक्षात बसून, चर्चा करून निकाल घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. जे इतर राज्यात घडलंय त्याशिवाय वेगळे काही घडणार नाही.

शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक- शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात स्व. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केले की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात पाठिंबा दिला पाहिजे. सहकार्याची भूमिका घेताना विधानसभेला राज्यात एकही उमेदवार शिवसेनेने उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळात अजून कटुता वाढू नये यासाठी त्यांनी हा निकाल घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणारे हिंदुत्व भाजपकडून केले जाते. जो समाजाच्या ऐक्याला तडा देतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम- आज देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर हल्ले असे प्रश्न आहेत. राज्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चार हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. ज्या राजवटीत महिलांना संरक्षण मिळत नाही त्यांना राज्य चालवण्याचा काय अधिकार आहे? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यामुळे या लोकांवर विश्वास योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम आपल्या सर्वांना करायचे आहे.

आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया.

उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

Back to top button
error: Content is protected !!