वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील सेवानिवृत्त एसटी चालकाच्या मुलाला नौकरी लावून देतो म्हणून १० लाखाला गंडवले ! राज्यपालांच्या टेबलावर पैसे द्यावे लागतात, अशी थापही भामट्याने मारली !!

महाराष्ट्र शासन अशी पाटी असलेल्या कारमध्ये तो भामटा भेटायचा

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – तुमच्या बेरोजगार मुलाला नौकरी लाऊन देतो अशी थाप मारून भामट्याने वैजापूर तालुक्यातील सेवानिवृत्त एसटी चालकाला तब्बल १० लाख ६० हजारांना गंडवले. महाराष्ट्र शासन अशी पाटी असलेल्या कारमध्ये तो भामटा भेटायचा. यामुळे विश्वास बसला आणि सेवानिवृत्त एसटी चालकाला आपल्या आयुष्य भराच्या जमा पुंजीवर पाणी सोडावे लागले. सुरुवातीला ३० हजार रुपये त्याने घेतले. त्यानंतर वेगवेगळी थाप मारली. चक्क राज्यपालांच्या टेबलावर पैसे पोहोच करावे लागतात, अशी थाप मारण्याची मजलही त्याने गाठली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेवानिवृत्त एसटी चालकाने शिऊर पोलिस स्टेशन गाठून हकिकत कथन केली.

सुरेश निवृत्ती खांडगारे (निवृत्त एसटी ड्रायव्हर वय 60 वर्षे रा. शिऊर ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते एसटीचे सेवानिवृत चालक आहेत. त्यांना एक मुलगा व दोन मुली असून मुलगा बेरोजगार आहे. सुरेश खांडगारे एस. टी. ड्रायव्हर या पदावर कार्यरत असताना दर आठवड्याला चाळीसगाव येथे बस गाडी घेऊन जात होते. तेथे मुक्काम होत असे व सकाळी निघत असे.

एके दिवशी फेब्रुवारी 2019 दरम्यान सुरेश खांडगारे यांची रामचंद्र कृष्णा पाटील (वय 50 वर्षे) यांच्याशी ओळख झाली. रामचंद्र पाटील हे सुरेश खांडगारे यांना म्हणाले की, मला त्यांच्या मुलाची फी भरायची आहे तुम्ही 20 हजार रुपये माझ्या मुलाकडे म्हणजे सुरेश खांडगारे हे कार्यरत असलेल्या वैजापूर या ठिकाणी त्यांनी दिलेली वीस हजार रुपये त्यांच्या मुलाकडे देण्यास सांगितले. अशाप्रकारे दोघांची ओळख झाली. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये धान्याची गोणी पत्नीकडे पोहच करण्यास त्यांनी सांगितले.

सुरेश खांडगारे यांचा मोबाईल क्रमांक रामचंद्र पाटील यांच्याकडे होता. एके दिवशी रामचंद्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना फोन करुन सुरेश खांडगारे यांचा मुलगा काय करतो अशी विचारणा केली. मी त्याला नोकरीला लावुन देऊ शकतो असे त्याने फोनवर सुरेश खांडगारे यांना सांगितले. आदिवासी कोट्यातून जागा महसुल विभागात रिक्त आहेत असे सांगितले. सुरेश खांडगारे यांचा मुलगा बेरोजगार होता. रामचंत्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना आधार कार्ड पासपोर्ट फोटो पॅन कार्ड व 30 हजार रुपये रोख रक्कम मागितली.

सुरेश खांडगारे यांना सुरवातीला विश्वास बसत नव्हता परंतु एक दिवशी शिऊर गावात त्यांच्या घरी महाराष्ट्र शासन असे नाव असलेल्या ऍम्बेसिडर या गाडीत सुरेश खांडगारे यांना भेटण्यासाठी रामचंद्र पाटील आले. मी पाच जिल्हयांचा महसुल विभागात अधिकारी आहे, वेळ वाया घालवू नका मी तुमच्या मुलाचे काम करून देतो असे रामचंद्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना सांगितले.

सरकारी गाडी व एवढा मोठा अधिकारी आहे म्हणून सुरेश खांडगारे यांनी त्यास 30 हजार रुपये व झेरॉक्स दिले. आता तुमच्या कामाल सुरवात झाली आहे. तुम्ही निश्चित राहा व या गोष्टीची कुठेही चर्चा करु नका असे रामचंद्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना सांगितले. मंत्रालयामध्ये पैसे द्यावे लागतात, असे म्हणून रामचंद्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार सुरेश खांडगारे यांनी दिनांक 25/02/2019 रोजी 70 हजार रुपये त्यांना रोख स्वरुपात दिले. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचे काम होऊन जाईल, असा दिलासाही रामचंद्र पाटील यांनी सुरेश खांडगारे यांना दिला.

त्यानंतर परत दिनांक 04/03/2019 रोजी 50 हजार रुपयांची मागणी केली व दिनांक 04/03/2019 रोजी सुरेश खांडगारे यांनी ते पैसे दिले. त्यानंतर रामचंद्र पाटील म्हणाले की, आता ही शेवटची रक्कम आहे नंतर पैशाची गरज नाही तुमचे काम झालेले आहे पण नंतर परत त्यांना राज्यपाल यांच्या टेबलावर पैसे पोहचले नाही असे सांगितले व दिनांक 27/03/2019 ला 50 हजार रुपये सुरेश खांडगारे यांच्याकडून घेतले. रामचंद्र पाटील व सुरेश खांडगारे यांचे सायंकाळी पाच ते सहा दरम्यान बोलणे होत असत.

दरम्यान, पुन्हा दिनांक 29/04/2019 रोजी एक लाख रुपये दिले. हा सर्व व्यवहार शिऊर चाळीसगाव बस स्थानक येथे रोखीने झाला. त्यानंतर दोघांची चाळीसगाव वैजापूर शिऊर बस स्थानक येथे भेट होत असे. प्रत्येक वेळी रामचंद्र पाटील हे महाराष्ट्र शासनाची पाटी असलेल्या गाडीत येत असत, त्यामुळे सुरेश खांडगारे हे बिंदास होते. प्रत्येक वेळी शंभर टक्के काम होणार, अशी ग्वाही ते द्यायचे.

त्यांनंतर परत दिनांक 17/05/2019 रोजी 1 लाख रुपयांची मागणी केली. राज्यपाल यांच्या टेबलला परत पैसे पोहचले नाही व दिनांक 24/06/2019 रोजी 1 लाख रुपये सुरेश खांडगारे यांनी रामचंद्र पाटील यांना दिले. यानंतर सुरेश खांडगारे यांनी नोकरीचे काय झाले यासंदर्भात पाठपुरावा केला असता रामचंद्र पाटील यांची भाषा बदलली होती व ते आता रुबाबात बोलत होते. तुमच्या मुलाची नोकरीची ऑर्डर आता निघाली आहे फक्त दोन लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत एक दोन महिने असे करत करत तुमची ऑर्डर येऊन जाईल असे त्यांनी सांगितले. कोरोना चालु आहे म्हणून तुमच्या कामाला उशीर लागत आहे असे त्यांनी सांगितले. आता फक्त शेवटचे एक लाख रुपये द्या, त्यानुसार सुरेश खांडगारे यांनी दिनांक 27/08/2019 रोजी रक्कम सुपुर्द केली. त्यांनंतर ते म्हणाले की आपल्या कामाची केस आदिवासी कोट्यामध्ये असल्याने कोर्टात गेली आहे. आपल्याला केस लढवण्यासाठी 2 लाख 60 हजार रुपये हवे आहेत. जर ही रक्कम तुम्ही मला देत असाल तरच आपले काम होईल अन्यथा ही जागा दुस-याला जाईल. त्यानंतर शेवटचे इस्टॉलमेंट कॅश न देता चेक बुक नसल्यामुळेपुतण्याच्या अकॉउंटमधून आर टी.जी.एस. द्वारे रामकृष्ण पाटील याच्या खात्यावर 2 लाख 60 हजार ट्रान्सफर केले.

त्यानंतर रामचंद्र पाटील यांनी मोबाईल नंबर बदलला. त्यामुळे सुरेश खांडगारे यांनी चाळीसगाव येथे जाऊन चौकशी केली असता लक्ष्मीनगर चाळीसगाव येथे त्यांचे घर सापडले. ते भाड्याच्या घरात राहत होते असे मालकानी त्यांचा परत नवीन मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर हा व्यक्ती फ्रॉड असल्याचे सुरेश खांडगारे यांच्या लक्षात आले.प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ येथे आयुष्यभर सेवा करून आयुष्याची जमापुंजी त्या व्यक्तीला दिली. मात्र, त्याने दगा दिला. मुलगा बेरोजगार असल्याने काळजीपोटी त्यांनी ही रक्कम दिली मात्र, प्रत्येकवेळी वेगदवेगळी थाप मारून पैसे उकळून रामचंद्र पाटील पसार झाला. आतापर्यंत 10 लाख 60 हजार रुपये एवढी रक्कम दिल्याचे सुरेश खांडगारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिऊर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!