छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

भडकाऊ भाषण केल्यामुळे कालीचरण महाराजांसह आयोजकांवर सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा ! मोढा बुद्रुकमधील विराट हिंदु सभा व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेली विराट हिंदु महासंकल्प धर्म जागरण सभा व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपाखाली कालीचरण महाराज उर्फ अभिजित धंनजय सराग यांच्यासह आयोजकांवर सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शांतता राखा व सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यासंदर्भात सध्या भराडी बीट अंमलदार म्हणून कार्यरत असलेले सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोहे यतीन सुरेश कुलकर्णी यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक 13/05/2023 रोजी मौजे मोढा बुद्रुक येथील कालीचरण महाराज यांची विराट हिंदु महासंकल्प धर्म जागरण सभा व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रमाची रेकॉर्डींग केलेली व्हिडीओ क्लीपची त्यांनी बारकाईने बघीतली. त्यात त्यांना आक्षेपार्ह वक्तव्य दिसले.

1) कमलेश गोविंदजी कटारिया मुख्य कार्यक्रम आयोजक रा. सिल्लोड, 2) सुनिल त्र्यंबक जाधव रा. मोंढा बुद्रुक (कार्यक्रम नियोजनाचे अध्यक्ष रा. मोढा बुद्रुक ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या आयोजकांनी दिनांक 10/05/2023 रोजी पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण येथे मोढा बुद्रुक येथील कालीचरण महाराज यांची विराट हिंदु महासंकल्प धर्म जागरण सभा व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे पोलीस स्टेशनला कळवले होते.

त्या अनुशंगाने पोलिस स्टेशन सिल्लोड येथून त्यांना सदर कार्यक्रमामध्ये दोन समाज / धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नये तसेच जिल्हाधिकारी यांनी कलम 37 (1) (3) मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू असून त्यातील अटीचे उल्लघंन करू नये म्हणून सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात आली होती.

सदर सभा बंदोबस्त कामी पोलीस निरिक्षक उदार, पोउपनि आडे, पोउपनि क्षीरसागर, सफौ वाघ, पोह काळे, पोना जाधव, पोना काकडे, पोअं जाधव व इतर तसेच व्हिडीओग्राफर व दोन पंच असे हजर होते. दिनांक 13/05/2023 रोजी मधुकर नाईक यांच्या शेतामध्ये 20.00 वाजता सुरू होऊन 22.00 वाजता संपली. सदर सभेमध्ये प्रथम केतन कल्याणकर (रा. सिल्लोड) यांनी गीत गायन केले.

त्यात काही अक्षेपार्ह वाक्य होते. त्यानंतर कालीचरण महाराज उर्फ अभिजित धंनजय सराग (रा. अकोला) यांनी त्यांच्या भाषणात दोन धर्मांत तणाव, तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. समाजास भडकाविण्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सदर व्हिडीओग्राफी पोलिसांनी वारंवार बघून त्यातील मजकुर समजून घेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर वक्तव्यावरून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केल्याच्या आरोपाखाली सिडको ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद देण्यात आली आहे.

पोहे यतीन सुरेश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) कालीचरण महाराज उर्फ अभिजित धंनजय सराग रा. अकोला व 2) कमलेश गोविंदजी कटारिया मुख्य कार्यक्रम आयोजक रा. सिल्लोड, 3) सुनील त्र्यंबक जाधव रा. मोंदा मुटुक कार्यक्रम नियोजनाचे अध्यक्ष 4) केतन कल्याणकर रा. सिल्लोड यांचे विरुध्द सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!