महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार !

उस्मानाबाद, दि. 16 -: राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. राज्य शासनासाठी ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी असून त्यासाठी लवकरच राज्यस्तरावर चार ते पाच हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची निविदा काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सहकार मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राजा राऊत, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून शासकीय आणि खासगी जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहित करण्याच्या कामाला महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने प्रथम प्राधान्य द्यावे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या अलनिनो वादळामुळे पावसाळा लांबणीवर गेला असल्याने या काळात जलयुक्त शिवार योजनेची जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत. जेणेकरून कमी पाऊस पडला तरीही संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच योजनेसाठी निवड झालेल्या सर्व गावांमध्ये तातडीने कामे सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मंजूर असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. या मोहीम कालावधीत घरकुलासाठी जमिनीचा प्रश्न, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करावीत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असल्याने केंद्र आणि राज्य शासनाचे या जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरु असलेली सर्व विकास कामे वेगाने आणि निश्चित कालावधीत पूर्ण होतील, याची खबरदारी घ्यावी. या विकासकामांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

टेंभूर्णी ते कुसळंब या मार्गाच्या कामाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीने पूर्ण करावे. हा रस्ता मराठवाड्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याने कामाला प्राधान्य द्यावे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांची बैठक घेवून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी आणि सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी विधिमंडळ सदस्यांनी जिल्ह्यातील विकास कामांच्या अनुषंगाने सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रास्ताविक आणि विकासकामांविषयी सादरीकरण केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीपूर्वी उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उस्मानाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील जागेची पाहणी केली. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी महाविद्यालयाची सद्यस्थितीतील इमारत आणि प्रस्तावित जागेबाबत माहिती दिली. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची 12 हेक्टर आणि जलसंपदा विभागाची 9.36 हेक्टर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!