छत्रपती संभाजीनगर

महावितरणच्या ऑपरेटरांचा छत्रपती संभाजीनगरात आज राज्यस्तरीय मेळावा ! अतिरिक्त कामाचा मोबदला, वेतन तफावतीवर चर्चा व पुढील रणनीति ठरणार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – महावितरणच्या विविध उपकेंद्रात काम करणाऱ्या ऑपरेटरांचा संघटना विरहित राज्यस्तरीय मेळावा छत्रपती संभाजी नगर येथे रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समितीच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन होत असून, राज्यभरातील बहुसंख्य ऑपरेटर्स या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

बीड बायपासच्या रामकिशन लॉन्सवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महावितरण मधील ऑपरेटरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच संघटनांच्या केंद्रीय अध्यक्ष व सरचिटणीस यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. ऑपरेटरांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती व निर्णय घेण्यात येणार आहे.

महावितरणची वीज उपकेंद्रे ही ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु या उपकेंद्रात काम करणाऱ्या ऑपरेटरांना कंपनीकडून आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येत नाही. मराठवाडा व जळगाव परिमंडळात सन 2017 पासून ऑपरेटरांना कराव्या लागलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात येत नाही. अनेक उपकेंद्रात सुरक्षारक्षक नाही. प्रशासन साधे पिण्याच्या पाण्याचीही सोय करीत नाही, स्थानिक पातळीवरील असेही काही ज्वलंत प्रश्न आहेत.

मुख्य कार्यालय पातळीवरील आर्थिक विषयाचे प्रश्न सन 2005 पासून प्रलंबित आहेत. त्यात वेतन ॲनामली हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबतीत आजवर केवळ पत्र व्यवहार व चर्चा झाली असून प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळत नसल्याने ऑपरेटरांचे आर्थिक नुकसान व शोषण होत आहे. अनेक वर्षे प्रश्न सुटत नसल्याने यातील त्रूटी, संभाव्य पर्याय, व परिणामांवर सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हजारोंच्या संख्येने ऑपरेटर्स एकत्र जमणार असल्याने हा मेळावा ऐतिहासिक स्वरूपाचा होईल. संघटना वाद बाजूला सारून केवळ यंत्रचालक म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ऑपरेटर्स बचाव कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून करण्यात आले आहे. अशी माहिती सुनील टिप्परसे, यंत्रचालक यांनी दिली.

महावितरण ऑपरेटरांचे प्रश्न-
नोकरीत लागताना समान वेतन, परंतु पुढे मानवनिर्मित करण्यात आलेली वेतन तफावत दूर करणे,
कंपनीकरणामुळे पदोन्नतींचे चॅनेल विस्कळीत झाल्याने निर्माण झालेली वेतन ॲनामली सोडवणे,
सन 2019 नंतरच्या नवीन उपकेंद्रात कायम कामगारांची नेमणूक करणे, सहाय्यक कर्मचाऱ्यांचा कंत्राटी कालावधी सेवा म्हणून ग्राह्य धरणे,
महावितरणची सर्वच उपकेंद्रे अपग्रेड करणे. महाराष्ट्रातील सर्व यंत्रचालक यांनी मेळावास उपस्थित राहावे असे आवाहन सुनील टिप्परसे सर्कल सचिव नांदेड यांनी केलं आहे.

Back to top button
error: Content is protected !!