महाराष्ट्र
Trending

तलाठ्यासाठी पंटर लाच घेताना जाळ्यात, ३९ गुंठे जमीन बक्षीसपत्राची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी ५ हजार घेतले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – ३९ गुंठे जमीन बक्षीसपत्राची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी तलाठी व त्याचा पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात अलगद अडकले. तलाठ्यासाठी ५ हजारांची लाच घेताना त्याचा पंटर रंगेहात पकडण्यात आला. तलाठी सजा सोनोरी (ता. पुरंदर, जि. पुणे) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

१) निलेश सुभाष गद्रे, वय ४२ वर्ष, पद तलाठी (वर्ग-३), सजा सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे, २) आदित्य मधुकर कुंभारकर, वय २१ वर्ष, रा. वजपुरी, ता. पुरंदर, जि. पुणे. (खाजगी व्यक्ती) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे शेतकरी असून तक्रारदाराच्या आजोबांनी तक्रारदारांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती. सदर बक्षीसपत्राची नोंद सात-बारा उता-यावर करण्यासाठी तक्रारदार यांनी रितसर अर्ज सजा सोनोरी कार्यालयास दिलेला होता. सजा कार्यालयातील तलाठी लोकसेवक निलेश गद्रे यानी तक्रारदार यांच्याकडे सदर बक्षीसपत्राची नोंद सात-बारा उता-यावर करण्यासाठी ५,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यानी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक क्र. १ निलेश गद्रे व आरोपी क्र. २ खाजगी व्यक्ती आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे आजोबांनी बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या जमीनीची नोंद सात बारा उता-यावर करण्यासाठी ५,०००/- रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून, आरोपी क्र. २ आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडून रुपये ५,०००/- (पाच हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारले. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

Back to top button
error: Content is protected !!