छत्रपती संभाजीनगर
Trending

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले आहे.

गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी.

गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912, 1800-212-3435 व 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता डॉ.केळे यांनी दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!