छत्रपती संभाजीनगर
Trending

११ शिक्षक मुख्याध्यापकांवर गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ ! विद्यापीठाचे कुलसचिव भगवान साखळेंवरही एफआयआर, निवडणूक कामास दांडी मारणे अंगलट !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- निवडणुक विभागाने मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले असतानाही छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयात सुरु असलेल्या निवडणुक कामकाजावर हजर न होता टाळाटाळ करणार्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विद्यापीठाचे कुलसचिव भगवान साखळे यांच्यासह ११ शिक्षक व मुख्याध्यापकांचा समावेश आहे. वारंवार नोटीसा व भ्रमणध्वनी करूनही या ११ जणांनी प्रतिसाद न दिल्याने तहसील प्रशासनाने या सर्वांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

एस जी मिसाळ (गजानन बहुद्देशीय शाळा, गारखेडा), श्वेता रमाकांत साबळे (गजानन बहुद्देशीय शाळा, गारखेडा), श्रीमती देशमुख (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), एस ए शेख (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), एस डी जाधव (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), डॉ. भगवान के साखळे (कुलसचीव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), आर टी साबळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), श्रीमती ताजवे (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव), कि दौ बावस्कर (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव), कैलास टेकाळे (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात रमेश परसराम तांबे (वय 45 वर्षे, व्यवसाय नौकरी अव्वल कारकून तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सध्या 109 छत्रपती संभाजीनगर (पूर्व ) विधानसभा मतदानसंघ निवडणूक शाखा तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अधिपत्या खाली काम करित आहे. भारत निवडणुक आयोगाने दि. 01/01/2024 रोजी विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्याक्रम घोषित केलेला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुक विभागाने मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले आहे.

या अनुषंगाने दि. 11/09/2023 रोजी गजानन बहुउद्देशीय शाळा गारखेडा छत्रपती संभाजीनगर यांचे मुख्याध्यापक 1) मिसाळ पदनाम मुख्याध्यापक, यादी भाग क्र. 102. कार्यालयाचे/ शाळेचे नाव – गजानन बहुउद्देशीय विद्यालय गारखेडा, यांना पत्र देवून श्वेता रमाकांत साबळे पदनाम सह शिक्षक, यादी भाग क्र. 103, कार्यालयाचे / शाळेचे नाव – गजानन बहुउद्देशीय विद्यालय गारखेडा, यांची नमुद यादी भाग क्र. 103 करीता (BLO) नेमणुक करण्यात आली आहे. तरी ते कर्तव्यावर हजर झाले नाही तसेच त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मोकळीक दिलेली नाही. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमीक कन्या विद्यालय गारखेडा येथील मुख्याध्यापक श्रीमती देशमुख यांना पत्र देवून शेख एस.ए. (सह शिक्षक) व जाधव एस.डी. (सह शिक्षक) यांना (BLO) यादी क्र. 83.90 प्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे. तरी ते कर्तव्यावर हजर झाले नाही. तसेच त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मोकळीक दिलेली नाही.

तसेच कुलसचीव डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील कुलसचीव डॉ. भगवान के साखळे यांना पत्र व्यवहार करून आर. टी. साबळे (वरिष्ठ सहाय्यक) यांना (BLO) यांचे पर्यवेशक म्हणून नियुक्त करण्यात आल्या बाबत माहिती देण्यात आली होती. तरी ते कर्तव्यावर हजर झाले नाही. तसेच त्यांचे कुलसचीव यानी त्यांना मोकळीक दिलेली नाही. मुख्याध्यापक नामे श्रीमती लाजवे मॅडम यांना पत्र देवून कि दौ. बावस्कर (सह शिक्षक) व कैलास टेकाळे (सह शिक्षक) यांना (BLO) नेमणूक करण्यात आली आहे. तरी ते कर्तव्यावर हजर झाले नाही, तसेच त्यांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मोकळीक दिलेली नाही.

वर नमूद मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी नेमून दिलेल्या यादी भागाचे काम अद्दापपर्यंत पूर्ण झाले नाही. तसेच वरील कर्मचारी हे नेमून दिलेल्या कर्तव्या करिता हजर झाले नाही. त्यामुळे निवडणुक कामकाजात अडथळा निर्माण झालेला आहे. संबंधीतांना त्यांच्या असमाधानकारक कामा बद्दल व दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्या बाबत वेळोवेळी नोटिसा बजविण्यात आल्या असून त्यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. संबंधीतांचे वर्तन बेजबाबदार पणाचे असून त्यांना निवडणुक कामाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!