महाराष्ट्र
Trending

जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना ! तीन महिन्यांत अहवाल सादर करणार, संप मागे घ्या !!

संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

मुंबई, दि. १५ – जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सन 2023-24 चा अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह 49 सदस्यांनी सहभाग घेत चर्चा केली.

संप मागे घेण्याचे आवाहन

राज्य शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतीत करता यावे, याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. संपामुळे नागरिकांच्या ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!