महाराष्ट्र
Trending

Breaking news: समृद्धी महामार्गावर शहरांना जोडणाऱ्या इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्ते करणार ! प्रस्तावित स्मार्ट सिटींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर !!

- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 21 : समृद्धी महामार्गावर २५-३० किमी अंतरावर पर्यायी रस्त्यांसाठी इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरांना जोडणाऱ्या इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री देसाई म्हणाले की, समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड फाटा येथील इंटरचेंजमुळे पलीकडच्या गावांना २२-२४ किमी अंतर पार करून जावे लागते.

यासाठी पळसखेड ते असोला फाटा हे ९ किमी अंतर आणि जउळखेड मार्गे ते असोला फाटा हे १२ किमी अंतर असे दोन पर्याय आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करून दोन्ही पर्यायांपैकी कुठला पर्याय वापरता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल.

तसेच समृद्धी महामार्गावरील स्मार्ट सिटीच्या संदर्भातील प्रस्तावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रस्तावित स्मार्ट सिटींसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!