छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार माहिती तंत्रज्ञानाचे धडे ! कुलगुरुंच्या हस्ते शनिवारी लोकार्पण !!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उभारली अत्याधुनिक लॅब, दीडशे विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- अवघ्या दीडशे उंब-याचं गाव असलेल्या सुदामवाडी जिल्हा परिषदेच्या प्रशालेत उभारली गेली अत्याधुनिक ’कॅम्प्यूटर लॅब’ उभारण्यात आली आहे. या निमित्ताने पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संगणक प्रशिक्षणाची इच्छापूर्ती होत असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते या लॅबचे शनिवारी लोकार्पण होत आहे.

या यशोगाथेची माहिती अशी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास राज्य शासनाने राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन अंतर्गत ५० लाखांचा निधी दिला आहे. या निधीतून ग्रामीण भागास संगणक साक्षरता प्रशिक्षणचे कार्य करण्यात येत आहे. सुदामवाडी या वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत अत्याधुनिक संगणक उभारणची योजना शिक्षक व गावक-यांनी बोलून दाखविली. ही बाब समजताच कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी तात्काळ या योजनेतंर्गत ३ लाख ८० हजारांचा निधी मंजूर केला.

या शाळेतील शिक्षक, शालेय समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनीही यासाठी एक लाखांचे योगदान दिले. जवळपास पाच लाख रुपये खर्चून ही लॅब तयार करण्यात आली आहे. १० संगणक, इंटरनेट व ऑनलाईनसाठीचे साहित्य यातून घेण्यात आले व ही लॅब उभारण्यात आली. या लॅबचा लाभ या शाळेत पहिली ते आठवी वर्गात शिकणा-या १५२ विद्यार्थ्यांना होणार आहे. १९६५ मध्ये सुरु झालेल्या या जिल्हा परिषद शाळेत ही सुविधा चालू शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ.रत्नदीप देशमुख, विभागप्रमुख डॉ.सचिन देशमुख, प्रकल्पाचे मुख्य अधिकारी डॉ.बाबासाहेब सोनवणे व सह अधिकारी डॉ.स्मिता ललित कासार यांनी पुढाकार घेतला. ’एमआयटी’चे ही सहकार्य या उपक्रमास लाभले. तसेच मुख्याध्यापक संजय शिंदे व सर्व सहकारी शिक्षक, सरपंच प्रभाकर सोनवणे, उपसरपंच मयुरी जगधने, शालेय समितीच्या रेणुका जगधने, ज्ञानेश्वर पवार, केंद्रपमुख दिलीप ढमाले आदींनीही आर्थिक पाठबळ दिले.

आज लोकार्पण
जिल्हा परिषद प्रशाला सुदामवाडी येथे शनिवारी दि.१५ सकाळी ११ वाजता कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ’संगणक लॅब’चे लोकार्पण करण्यात येईल. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, ’एमआयटी’चे डॉ.मुनीष शर्मा, प्राचार्य डॉ.संतोष भोसले, डॉ.रत्नदीप देश्मुख, डॉ.सचिन देशमुख, मनिष दिवेकर, हेमंत उशीर, बी.के.म्हस्के, डॉ.गणेश साबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी : कुलगुरु
’सामाजिक बांधिलकी’च्या भावनेतून विद्यापीठाने संगणक लॅब उभारणीत योगदान दिले. ’कोविड’च्या काळात विद्यापीठाने दोन लॅब उभारल्या. शिक्षण, संशोधन विस्तार व सेवा ही विद्यापीठाची कर्तव्ये आहेत. त्यामुळे ग्रामविकासात आम्ही योगदान देऊ शकलो. याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!