छत्रपती संभाजीनगर
Trending

वाळूज पंढरपूर मार्गावरील वाहतूक मार्गात मोठा बदल ! नगर, नाशिक, धुळे, बीड, जळगाव, जालन्याला जणाऱ्या वाहनांसाठी हा असेल पर्यायी मार्ग !!

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिस अलर्ट मोडवर

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – मिनी पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेल्या मौजे पंढरपूर (वाळूज) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गत बदल करण्यात आला आहे. पोलिसांनी आजच हा आदेश जारी केला असून दि. २८ ते २९ पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीत मौजे पंढरपूर गावात प्रसिध्द विठ्ठल-रुख्मिणी मंदिर आहे. दिनांक २९/०६/२०२३ रोजी आषाढी एकादशी असून, एकादशीच्या निमीत्ताने शहरातुन, आजु बाजुच्या गावांतील व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन व यात्रेसाठी येतात. सदर विठ्ठल-रुख्मिणी मंदीर हे छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर राज्य महामार्गाला लागून आहे. या महामार्गावरून आजु-बाजुची गावे व परिसरातून मौजे पंढरपुर गावाकडे सुमारे १५०-२०० लहान मोठ्या दिंड्या मार्गक्रमण करतात.

तसेच तेथे राज्य महामार्ग रोडच्या दोन्ही बाजुला यात्रेच्या निमित्ताने छोटे विक्रेते आपली दुकाने लावतात. करीता सदर परिसरात नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन नागरीकांच्या सुरक्षितेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून मौजे पंढरपुर, वाळुज परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीचे नियमन केले आहे.

दिनांक २८/०६/२०२३ रोजी २०.०० वाजेपासून ते दिनांक २९/०६/२०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर राज्य महामार्गावर खालील प्रमाणे वाहतूक नियोजन करण्यात येत आहे.
१) ए. एस. क्लब चौक ते कामगार चौक पर्यंत रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. २) ओअॅसिस चौक ते आंबेडकर चौक (FDC Corner) रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. (यात्रा स्पेशल बसेस, राज्य परिवहन महामंडळ यांच्या बसेस यांना महावीर चौक पर्यंत प्रवेश राहील.) ३) तसेच सदर महामार्गावरील नगरनाका ते ए. एस. क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

असा आहे पर्यायी मार्ग –
१) जालना / बीड कडून अहमदनगर- पुणेकडे जाणारी वाहने ही महानुभव आश्रम चौक, लिंक रोड टी – संताजी चौकी – पाटोदा टी मार्गे जातील व येतील.
२) जालना / बीड / जळगाव कडून धुळे / नाशिकडे जाणारी वाहने लिंक रोड- राष्ट्रीय महामार्ग NH- ७५२ – A (नविन सोलापूर – धुळे हायवे ) या मार्गाने जातील व येतील.
३) छत्रपती संभाजीनगर कडून पुढे पुणे कडे जाणारी वाहने नगरनाका, ए. एस. क्लब, तिसगांव चौफुली किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक रांजणगाव – एफडीसी कॉर्नर – कामगार चौक मार्गे पुढे जातील व येतील.

४) पुणे – अहमदनगर कडून धुळे – नाशिककडे जाणारी वाहने कामगार चौकातून डावीकडे वळून एफडीसी कॉर्नर, रांजणगाव, एनआरबी चौक, साजापुर गावातून पुढे राष्ट्रीय महामार्ग NH- ७५२ – A (नविन सोलापुर – धुळे हायवे ) मार्गे पुढे जातील.

बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. सदर अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही. अधिसुचनेचा भंग करणारी व्यक्ती म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!