चारित्र्यावर संशय घेवून पत्नीचा खून, पतीला जन्मठेपेची शिक्षा ! जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ -: पत्नीच्या खून प्रकरणात दोषी ठरवत जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना व्ही. एम. मोहीते यांनी ही शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर भीमराव जाधव (वय ३१ वर्षे रा. भारज बु. ता. जाफराबाद जि.जालना ) असे शिक्षा सुनावलेल्या दोषीचे नाव आहे.
थोडक्यात घटनेची हकीकत अशी की, आरोपी व मयत हे नात्याने पती पत्नी असून आरोपी यांने दिनांक २५/०३/२०२२ रोजी दुपारी ०२.०० वाजता त्यांच्या घरी मृताचे चारीत्र्यावर संशय घेवून तिच्या डोक्यात व अंगावर लाकडी दांडा, काठी, विटकरीने व विळ्याने मारून गंभीर जखमी करून तिला जिवा निशी ठार मारले. फिर्यादी पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द पत्नीचा खून केला म्हणून पोलीस स्टेशन जाफ्राबाद जि. जालना येथे ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होवून संपुर्ण तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे सदर या प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी पोलीस पाटील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉ. संदीप ढासाळ, पंच साक्षीदार तपासीक अमंलदार पी. व्ही. मदन, पोलीस उपनिरीक्षक, पी.डी. बारवाल, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन जाफ्राबाद यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
न्यायालयापुढे सरकारपक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना श्रीमती व्ही.एम. मोहीते यांनी आरोपी ज्ञानेश्वर भीमराव जाधव, वय ३१ वर्ष रा. रा. भारज बु. ता. जाफाबाद जि. जालना यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी कलम ३०२ भादवी मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड भारत के. खांडेकर यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe